सांगोला नगरपरिषदेच्या कार्यालयाची जुनी इमारत पाडण्यात येत असल्याने या इमारती मधील सर्व विभागाचे कार्यालयीन कामकाज हे शेजारील नवीन इमारतीमध्ये करणेत येत आहे. आरोग्य विभाग,विद्युत विभाग,प्रधानमंत्री आवास योजना,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या विभागाकडील कामकाज हे अग्निशमन वाहनतळाच्या जागेमध्ये सुरु आहे, याची शहरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे .
सांगोला नगरपरिषदेकडील कर विभागाकडील मालमत्ता कराची बिले तयार करण्यात आलेली असून बिल वाटप सुरु करण्यात आले आहे.शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्ता कराच्या रकमा भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे. थकीत मालमत्ता कराच्या रकमेवर मासिक 2% शास्तीची आकारणी करण्यात येत असून लवकरात लवकर कर भरणा करून शास्ती टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
सांगोला नगरपरिषद हद्दीतील अद्याप पर्यंत नगरपरिषदेकडे नोंद नसलेल्या मालमत्तांची वार्षिक पुरवणी आकारणी अंतर्गत नोंद घेऊन कर आकारणी करणेचे कामकाज सुरु आहे. आतापर्यन्त 504 एवढ्या मालमत्ताची मोजणी नगरपरिषदेकडून करण्यात आली आहे.ज्या मालमत्तांची कर आकारणी झाली नाही अशा सर्व मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या मालमत्ताची कर आकारणी करून घ्यावी. अन्यथा असे मालमत्ताधारक महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 150 व कलम 189 नुसार मागील सहा वर्षांची आकारणी होणेस पात्र ठरतील यांची शहरातील सर्व मालमत्ता धारक यांनी नोंद घ्यावी.
सांगोला नगरपरिषदेच्या हद्दीत नागरी सेवा व सुविधेची कामे करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून सांगोला शहरात विविध १२ विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगरपरिषदेचे खुले सभागृह बांधणे,होलार समाजासाठी नगरपरिषद क्षेत्रात समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे, मिरज रोड येथील नाभिक समाज मंदिर येथे पहिला मजला बांधणे,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लादीकरण करणे , बुरुड समाजासाठी समाजमंदिर बांधणे , नगरपरिषद हद्दीतील चांडोलेवाडी, शेंबडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते विकसित करणे, मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता खडीकरण व ओढ्यावर सीडी वर्क करणे,नगरपरिषद हद्दीतील पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत आप्पासाहेब देशमुख घर ते नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्ता करणे, जुना सावे रोड पैलवान मंगल कार्यालय तानाजी बिले घर ते माण नदीपर्यंत रस्ता करणे, वाढेगाव रोड ते भाऊसाहेब पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे, चिंचोली रोड इन्नुस मुलाणी वस्ती येथे रस्ता करणे, एखतपूर रोड आरक्षण क्रमांक ६३ अ येथील भाजी मंडई येथे लाधिकरण करणे अशी १२ विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.
सांगोला नगरपरिषदेच्या कार्यालयाची जुनी इमारत पाडण्याचे काम चालू असल्याने 15 ऑगस्ट रोजी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या प्रांगणात सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला.
माझी वसुंधरा 5.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2.0 अंतर्गत सांगोला शहरात ” एक कुटुंब एक झाड,माझे लाडके झाड” हा उपक्रम सुरु असून या उपक्रमाअंतर्गत वंदे मातरम चौक,भीमनगर, जय भवानी चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत सांगोला शहरातील विविध शाळेत जनजागृती अभियान घेण्यात आले.
15 ऑगस्ट रोजी “शून्य कचरा” उपक्रमअंतर्गत जनजागृती करण्यात आली. तसेच “सफाई अपनाओ बिमारी बघाओ”या उपक्रमांतर्गत सांगोला शहरातील विविध ठिकाणी साफसफाई करण्यात आली.
सांगोला शहरातील नागरिकांचे भूखंडाचे गुंठेवारी नियमितिकरण करणेसाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम २०२१ अतर्गत दि १२-३-२०२१ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केल्यानुसार दिनांक ३१ डिसेबर २०२० पूर्वी विभागणी करण्यात आलेले भूखंड व त्यावर केलेल्या अनाधिकृत बांधकामासाठी न.प. नोंदणीकृत आर्किटेक्ट अथवा न.प. नोंदणीकृत इंजिनिअर्स याच्यामार्फत प्रस्ताव दिनांक ३१/१२/२०२३ पूर्वी दाखल करणे बंधनकारक होते.परंतु, सांगोला शहरातील गुंठेवारी विकास नियमाधीन करण्यासाठी पात्र असलेल्या भूखडाची संख्या भरपूर असल्याने दिलेल्या मुदतीचा कालावधी पुरेसा नसल्याने शहरात गुंठेवारी नियामितीकरणासाठी अनेक नागरिक इच्छुक असून मुदतवाढीची मागणी करत असून अशा आशयाचे विविध निवेदने या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.त्यास अनुसरून ज्या नागरिकांचे खुले प्लॉट, बांधकामे आहेत त्यांना गुंठेवारी विकास अधिनियमान्वये दिनांक ३१/१२/२०२४ पर्यंत नियमितीकरणासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
सांगोला नगरपरिषदेच्या माध्यमातून कर्तव्य शहरस्तर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
सांगोला नगरपरिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या केंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) या योजनेंतर्गत महिला सक्षमीकरण व त्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम घेतले जातात. या अनुषंगाने सांगोला शहरामध्ये २०० पेक्षा अधिक स्वयंसहाय्यता महिला बचत गट स्थापन करण्यात आलेले आहेत.स्थापन करण्यात आलेल्या १० ते १५ बचत गटाचे मिळून एका वस्तीस्तर संघाची स्थापना धर्मादाय आयुक्त यांच्याकडे करण्यात येते. असे एकूण ०९ वस्तीस्तर संघ स्थापन करण्यात आलेली आहेत व शहरातील सर्व वस्तीस्तर संघाचे मिळून कर्तव्य शहरस्तरसंघ स्थापन करण्यात आली आहे.
कर्तव्य शहर संघाच्या सर्व साधारण सभेचे आयोजन सांगोला नगरपरिषदेच्या माध्यमातून दि. १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली. या सर्वसाधारण सभेस साधारण शहरातील विविध बचत गटाच्या ५०० ते ६०० महिला सदस्या उपस्थित होत्या. सदर सर्वसाधारण सभेचे उद्घाटन समारंभ मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळीयांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बचत गटातील उपस्थित महिलांसाठी रोजगाराच्या सुवर्णसंधी या विषयावर श्री नंदकुमार दुपडेसरांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून १० बचत गटांना व सहयोगीणी सौ.कोमल चांडोले, सो. सारिका लोखंडे, व श्रीम.सविता लोखंडे यांना मागील ५ वर्षामध्ये उत्कृष्ट बचत गट चालविल्याबद्दल मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिक, व्यापारी व शेतकरी त्रस्त असल्याचे तक्रारी वारंवार नगरपरिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे नगरपरिषदेमार्फत मोकाट जनावरे पकडायची मोहीम हाती घेण्यात आली आहे.पकडलेली जनावरे ठेवण्यासाठी नगरपरिषदेने कोंडवाड्याची व्यवस्था केलेली असून 24 तास चारा, पाणी व देखरेख करणे कामी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच पंढरपूर नगरपरिषदेकडील मोकाट जनावरे पकडण्याचे वाहन उपलब्ध करून मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवण्यात येत आहेत. तसेच सदर जनावरांची आरोग्य तपासणी पशुधन विकास अधिकारी यांचे मार्फत केली जाते. आता पर्यंत नगरपरिषदेने 41 इतकी मोकाट फिरणारी जनावरे पकडून त्यांच्या मालकांकडून रक्कम रुपये 30,000/- इतकी शास्ती म्हणून वसूल करण्यात आली आहे.
सांगोला नगरपरिषद पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ जाहीर करण्यात आली आहे.त्या करीता आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयात घेण्यात आली. पथविक्रेता (उपजीवीका संरक्षण व पथविक्री विनिमय) महाराष्ट्र नियम २०१६ मधील प्रकरण ४ (११) यामध्ये पथविक्रेता समितीची रचना देण्यात आलेली आहे. यामध्ये शासकीय विभागाचे ५ सदस्य व इतर मंडळाचे १५ सदस्य देण्यात आले आहेत. इतर मंडळामध्ये पथ विक्रेते प्रतिनिधी यांची ८ सदस्य समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या, त्यानुसार पथ विक्रेता समिती निवडणूक २०२४ जाहीर करण्यात आली आहे. पथ विक्रेता अधिनियम २०२१ मध्ये पथ विक्रेते सदस्य यामध्ये अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्याक आणि विकलांग व्यक्ती यांच्या योग्य प्रतिनिधीत्वासह एक तृतीयांश महिला विक्रेत्या असतील असे नमूद केले आहे. त्यानुसार आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात आली.
सांगोला नगरपरिषद हद्दीतील नगरपरिषदेकडे नोंदणीकृत असलेल्या 138 दिव्यांग बांधवाना उदरनिर्वाहासाठी आर्थिक सहाय्य म्हणून प्रत्येकी 5000/-प्रमाणे एकूण 690000/- रुपये नगरपरिषदेमार्फत दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.