सांगोला ( प्रतिनिधी )कै. गुरुवर्य च. वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या ४३व्या स्मृती समारोहानिमित्त पुरुष गट राज्य निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेत मॅनिक स्पोर्ट्स अकॅडमी व इंडियन जिमखाना या मुंबईच्याच संघात अंतिम लढत होईल.
येथील सांगोला विद्यामंदिरच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या इंडियन जिमखाना संघाने पुण्याच्या डेक्कन जिमखाना संघास ६३-६२ असे एका गुणाने नमविले. शेवटच्या क्वार्टरपर्यंत झालेल्या चुरशीच्या सामन्यात पहिल्या १० मिनिटाच्या डावात पुण्याकडे १६-८ व मध्यंतरास १७-१४ अशी आघाडी होती. परंतु पुण्याला ती आघाडी टिकविता आली नाही. मध्यंतरानंतर मुंबईने बहारदार खेळी करीत संघाचा विजय खेचून आणला. शेवटच्या दहा मिनिटाच्या डावात कधी मुंबईकडे तर कधी पुण्याकडे आघाडी होती. अखेर मुंबईच्या संकेत खारबोर (१८) व ऋषभ खारबोर (११) यांनी संघाचा विजय खेचून आणला. पुण्याचा कर्णधार राजेंद्र सिंग (१७ गुण ) यांची लढत अयशस्वी ठरली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात मॅनिक स्पोर्ट्स अकॅडमीने घाटकोपर वायएमसीए संघावर
५३-३४ अशी सहज मात केली. या सामन्यात शेवटच्या दहा मिनिटाच्या डावात पावसाचा व्यत्यय आला होता. परंतु सांगोला विद्यामंदिरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हे मैदान परत सुरू करुन हा सामना पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. मॅनिक स्पोर्ट्स अकॅडमीच्या रियाझने (१६ ) तर तौफिक शेख (११ गुण) नोंदवीत संघाचा विजय सहज सुकर केला. घाटकोपरच्या करण दिल्होड (११ गुण) याची लढत अपुरी पडली.
पन्नास वर्षावरील गटात सांगली व कोल्हापूरने अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी पद्धतीने झालेल्या या सामन्यात सांगली व कोल्हापूरने सोलापूर व सांगोला या दोन्ही संघास हरविले.