विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पायोनियर शाळेमध्ये नेहमी विविध सण, उत्सव साजरे करण्यात येत असतात. श्रीगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आपल्या घरी पर्यावरण पूरक अशा मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, या हेतूने पायोनियर पब्लिक स्कूल मध्ये शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
शाळेतील सर्व शिक्षकांनी शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वतः मातीचे गणपती बनवून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनीही सहजतेने अशा मूर्ती साकारल्या. वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती स्वतःला करता आल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर होता.
शाळेचे प्राचार्य मा. श्री सतीश देवमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. संस्थेचे संस्थापक मा. श्री अनिल येलपले यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवावेत तसेच इतरांनाही अश्या मूर्ती बनवण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन केले.