सांगोला प्रतिनिधी…. थोर तत्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन दरवर्षी सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माणसाच्या जीवनामध्ये आई आणि वडीलानंतर ज्यांचं आढळ स्थान असतं ते म्हणजे आपले गुरु. गुरूंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात राहून सांगोला तालुक्याच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या काही गुणवंत गुरुजनांना आणि काही आदर्श शाळांना शिक्षक दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित करण्याचे आयोजन सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय, पॉलिटेक्निकल तसेच फार्मसी व इंजीनियरिंग कॉलेज, b.ed कॉलेज, आश्रम शाळा यासारख्या शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्व विभागातील शिक्षक व शाळांना समाविष्ट करत तालुकास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन आनंद लॉन्स सांगोला येथे येत्या 14 सप्टेंबर रोजी करण्यात येत असल्याची माहिती सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी दिली .
शिक्षकांमधून अधिकारी झालेले तसेच शिक्षकांच्या प्रति आदरभाव असलेले काही अधिकारी देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. शालेय पाठ्यपुस्तकातील ‘बाप ‘ सारख्या कवितांचे कवी आणि थोर विचारवंत इंद्रजीत भालेराव या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 43 शाखांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेबरोबरच सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये सूर्योदय महिला अर्बन, सूर्योदय अर्बन, सूर्योदय दूध विभाग व सूर्योदय मॉल अँड वस्त्रनिकेतन यासारख्या अनेक लहान-मोठ्या फर्म आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा सूर्योदय उद्योग समूह. या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले आणि त्यांचे मित्र सहसंस्थापक डॉ. बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत सर व सुभाष दिघे सर यांनी उद्योग आणि व्यवसायांबरोबरच गेली 14 ते 15 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी म्हणून देखील अनेक उपक्रम आजवर राबवलेले आहेत. वित्तीय संस्थांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना तसेच उद्योग व्यावसायिकांना आर्थिक आधार देणे, हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे, अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहत वेळोवेळी गुणवंतांचा सन्मान करणे . अशी सूर्योदय परिवाराची सुरुवातीपासूनची ओळख आहे.
सांगोला तालुक्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवून इतरांसमोर आदर्श उभा करणाऱ्या शाळांना ‘ सूर्योदय आदर्श शाळा ‘ हे गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देत कार्य करणाऱ्या विद्यार्थीप्रिय शिक्षकांना ‘ शिक्षक गौरव पुरस्कार ‘ तर काही सेवानिवृत्त गुरुजनांना ‘ जीवनगौरव ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विविध प्रशाला, जिल्हा परिषद शाळा, केंद्रप्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक व शिक्षक अशा अनेक गुरुजनांना यावेळी गौरविण्यात येणार आहे.