जवळा परिसरात महिला वर्गाकडून गौरीचे उत्साहात स्वागत.

जवळा( प्रशांत चव्हाण) श्री.गणेशाच्या आगमनानंतर महिला वर्गाला वेध लागले होते ते गौरीच्या आगमनाचे जवळा व आसपासच्या परिसरामध्ये मंगळवार दिनांक10 सप्टेंबर रोजी घरोघरी गौराई विराजमान झाल्या.गौरी आगमनामुळे महिला वर्गामध्ये उत्साह दिसून येत आहे. महालक्ष्मी कोणाच्या पायाने आली असे म्हणत तुळशी वृंदावना जवळून हळदी कुंकवाचे सडे घालत रांगोळीच्या पावलांनी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली.
आता तीन दिवस गौराई घरात राहून सर्वांना आशीर्वाद देणार आहेत.गौरीच्या येण्याने गौरीचा साजशृंगार,आरास आणि त्या जोडीला फराळ करण्यात अवघे कुटुंब दंग असल्याचे चित्र जवळा परिसरात पहावयास मिळाले. तसेच गणरायाच्या प्राण प्रतिष्ठापनेमुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्यातच मंगळवारी गौराईचे आगमन झाल्याने ज्या कुटुंबामध्ये गौराई विराजमान झाल्या त्या कुटुंबात आनंद,उत्साह द्विगुणीत झाला आहे. गौरी तीन दिवस माहेरवाशींनी म्हणून येतात त्यात पहिल्या दिवशी आगमन व भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचे जेवण, फराळ, हळदी कुंकू तर तिसऱ्या दिवशी दही,भाताचा नैवेद दाखवून गौरी विसर्जन केले जाते