सांगोला(प्रतिनिधी):- पाली-मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वार्षिक शब्दोत्सव अंतर्गत लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने जीवनगौरव व पुरस्कार प्रदान सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी दीड वाजता संपन्न होत आहे. यावर्षीचा लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना जाहीर झाला आहे.
तसेच लोकशिक्षक बाबा भारती कृषीभूषण पुरस्कार मेडशिंगी येथील कृषीनिष्ट शेतकरी डॉ. मच्छिंद्र सोनलकर, बाबा भारती साहित्य पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष जयश्री जयंत श्रीखंडे, लोकशिक्षक बाबा भारती पाली भाषा पुरस्कार पलुस (सांगली) येथील विधिज्ञ डॉ. सुगंध वाघमारे,लोकशिक्षक बाबा भारती काव्य प्रतिभा पुरस्कार सोलापूर येथील कवी माधव पवार यांच्या ‘ हे शुभ शकुनांचे पक्षी’ या पुस्तकास तर लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार पुणे येथील राम सर्वगौड यांच्या ‘ सोशल डिस्टन्स ‘ या ललित लेख संग्रहास जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कार वितरण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्रातील नामवंत वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते व सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष कृषीभूषण सुदाम भोरे व मानगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्र संवादक म्हणून पुणे येथील सुप्रसिद्ध निवेदक प्रा.दिगंबर ढोकले यांची उपस्थिती आहे.पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या राज्यातील बारा व्यक्तींना लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या कार्यस्थळी जाऊन या संस्थेच्या वतीने दिला जातो. वार्षिक शब्दोत्सव अंतर्गत हा चौथा पुरस्कार वितरण सोहळा सांगोला येथे संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे अध्यक्ष, निमंत्रक महेंद्र भारती व महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरीचे कार्याध्यक्ष मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
——————
कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी स्थापन केलेल्या सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित विद्यामंदिर संकुलाचे असंख्य विद्यार्थी समाजाच्या विविध क्षेत्रात आपले अतुलनीय काम करत आहेत.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर परिवाराचा शैक्षणिक उत्कर्ष सातत्याने वाढत आहे.विद्यामंदिर परिवारात शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर समाजात संस्कारक्षम नागरिक निर्माण होण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. ही संस्थेबाबतची सर्व माहिती इथे आल्यानंतर पहात असताना आम्ही सर्व कमिटीतील लोक भारावून गेलो. त्यामुळे प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हा सर्वांना मनस्वी आनंद होत आहे…..
*निमंत्रक महेंद्र भारती*
*अध्यक्ष लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे*