महुद बु॥: आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून,फीनिक्स संकुलने आज (४ जुलै २०२५) शाळेच्या प्रांगणातून पंढरपूरच्या विठ्ठलाची पायी दिंडी काढली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात या दिंडीत सहभाग घेतला.
सकाळी ठीक ८ वाजता शाळेचे संस्था अध्यक्ष श्री. पांडुरंग येडगे सर यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. या दिंडीचे नियोजन श्री संजय येडगे सर यांनी केले.तसेच भगवे पताका, तुळशी वृंदावन, आणि विठ्ठलाचे जयघोष करत विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. इयत्ता – बालवाडी वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या दिंडीत सक्रिय सहभाग घेतला.
या दिंडीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख करून देणे, तसेच वारकरी संप्रदायाच्या सामाजिक एकोपा आणि शिस्तीचे महत्त्व समजावून सांगणे हा होता. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असे अभंग आणि भजने गायली, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
शाळेच्या शिक्षकांनी आणि काही पालकांनीही दिंडीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहभाग घेतला. शाळेच्या परिसरातच या दिंडीचा समारोप झाला, जिथे विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेसमोर एकत्रितपणे प्रार्थना केली.
मुख्याध्यापक श्री. लवटे सर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आषाढी एकादशी ही महाराष्ट्राची एक महत्त्वाची परंपरा आहे. या पायी दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक महत्त्वच नव्हे, तर सामाजिक सलोखा आणि शिस्त याचे धडे मिळतात. भविष्यातही असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”ही दिंडी यशस्वी करण्यासाठी फीनिक्स इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका शेख मॅडम ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य शिंदे सर तसेच सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले
या दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य आणि धार्मिक भावना अधिक दृढ झाली. फीनिक्स संकुलचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.