महाराष्ट्र
आषाढीवारी निमित्त नाझरा विद्यामंदिर मध्ये साक्षरता दिंडीचे आयोजन

नाझरा (वार्ताहर):- ज्ञानेश्वर माऊली… ज्ञानराज माऊली तुकाराम…. रामकृष्ण हरी …जय जय राम कृष्ण हरी.. सारे शिकूया पुढे जाऊया… अशा जयघोषात वारकरी पोशाखात नाझरा विद्यामंदिर प्रशाला, ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम ची दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील असंख्य भक्त विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे येतात.विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना धन्यता वाटते. अनेक घरांमध्ये पिढ्यान पिढ्या या वारीचा वसा जपला जातो.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या वारीची असंख्य वैशिष्ट्य आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावर परंपरेने येणाऱ्या या वारीचा संस्कार जपला जावा, त्याचबरोबर उल्हास नवभारत साक्षरता अभियानाच्या दिंडीच्या माध्यमातून घरोघरी ज्ञानाची वारीही विद्यार्थ्यांच्या मनात जपली जावी या हेतूने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये माऊली माऊली रूप तुझे,विठ्ठल नामाची शाळा भरली, काना तुझ्यासाठी आले वनात,नको मारु रे कान्हा पिचकारी,तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो आणि पंढरीची वारी अशा भक्तीरसात चिंब होणाऱ्या विविध संस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नाझरा येतील मुख्य चौकात तसेच शंकर चौकात सांस्कृतिक कार्यक्रमांच सादरीकरण करण्यात आले.
प्रारंभी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक विनायक पाटील,मुख्याध्यापिका मंगल पाटील,प्रा. महेश विभुते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नाझरे गावातील विविध चौकातून विठू नामाचा गजर दुमदुमला… हातात टाळ कपाळी चंदनाचा टिळा… गळ्यात तुळशीची माळ… डोक्यावर टोपी असा पेहराव करून विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते तर डोक्यावर छोटीशी तुळस आणि विविध प्रकारची आभूषणे घालून विद्यार्थिनी या दिंडीत सहभागी झाल्या होत्या. नाझरा विद्यामंदिरच्या प्रांगणात चिमुकल्यांनी गोल रिंगण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सदर दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. महेश विभुते,संभाजी सरगर,शुभांगी नागरसे,दिलीप सरगर,नाझरा विद्यामंदिर व इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. खाऊ वाटप करून दिंडीची सांगता करण्यात आली.



