sangola
शिक्षक हाच देशाचा नायक आहे डॉ-श्रीपाल सबनीस
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव सन्मान प्रदान
सांगोला(प्रतिनिधी) :- सध्या राजकारणाच्या माध्यमातून समाजात होणारी अशुद्ध धर्माची उगवण लोकशाहीला घातक ठरत आहे.बाबा भारती यांचे विचार मूल्य पेरणारे आहेत,संस्कार पेरणारे आहेत सध्या विस्कटलेल्या समाजासाठी बाबा भारतीयांचे विचार म्हणजे अमृताची पेरणी आहे.बाबा भारती यांनी आयुष्यभर शिक्षकाची नोकरी करून समाजामध्ये माणसाचं सुख नक्की कशात आहे याचा शोध घेऊन जीवन मूल्यांची पेरणी केली.आज ज्यांना जीवनगौरव पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत असे प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी संस्थेच्या माध्यमातून समाजात चांगुलपणाचे संस्कार पेरले आहेत, म्हणून शिक्षक हाच देशाचा खरा नायक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.सांगोला येथे लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने जीवनगौरव सन्मान व पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, प्रमुख उपस्थिती म्हणून लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, उद्योगपती सुदाम भोरे, मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले,वैजनाथ घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड व पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला विद्यामंदिर येथे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला व कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकशिक्षक बाबा भारती यांच्या प्रतिमेचे पूजन वृक्ष पूजन करून झाली.त्यानंतर प्रभाकर वाघोले यांनी लोकशिक्षक ही कविता वाचन केली. प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष महेंद्र भारतीयांनी बाबा भारतीयांचे विचार व त्यांचे कार्य यांची संक्षिप्त ओळख करून दिली पुरस्काराची निवड कशा पद्धतीने झाली याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. जीवनगौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.त्यानंतर प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,शीला झपके यांना औक्षण करून डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी व तुळशी हार घालून लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच कृषीनिष्ठ शेतकरी डॉ.मच्छिंद्र सोनलकर यांना लोकशिक्षक बाबा भारती कृषीभूषण पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, शाखा- पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा जयश्री जयंत श्रीखंडे यांना लोकशिक्षक बाबा भारती साहित्ययात्री पुरस्कार,ॲड.डॉ.सुगंध मोहन वाघमारे एम.ए.(पाली) पलूस, सांगली यांना लोकशिक्षक बाबा भारती पाली भाषा पुरस्कार, ‘हे शुभ शकुनांचे पक्षी’ या कवितासंग्रहासाठी कवी माधव पवार, सोलापूर यांना लोकशिक्षक बाबा भारती काव्यप्रतिभा पुरस्कार, साहित्यिक राम सर्वगौड, पुणे यांना ‘सोशल डिस्टन्स’ या ललित लेखनासाठी लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.