राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने घेतली सकल धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट

– धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी गेली सहा दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक, पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
राज्य शासनाच्या शिष्टमंडळातून उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी सकल धनगर समाजाच्या मागण्याबाबत उद्या दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.