मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांचे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन*

सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे.
६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करणे करिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे.
सांगोला शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी सदर योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे. सांगोला नगरपरिषदेमार्फत अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नगरपरिषद कार्यालयातून अर्ज प्राप्त करावेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वाॅकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी उपकरणांपैकी एका उपकरणाच्या खरेदीसाठी शासनामार्फत तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्जासोबत आधार कार्ड/मतदान कार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, 65 वर्षे पूर्ण असल्याबाबतचा पुरावा, आर्थिक वर्षातील दोन लक्ष रुपयांच्या आतील स्वयंघोषणापत्र, अर्जदाराचे बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, अर्जदाराला उपकरणाची आवश्यकता असलेबाबतचा डॉक्टरांचा तपासणी अहवाल इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडावी.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील विविध तीर्थस्थळांचे दर्शन करता येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्जासोबत आधारकार्ड/रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा अंत्योदय अन्न योजना/प्राधान्य कुटुंब योजना/वार्षिक उत्पन्न रु.२.५० आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले शिधापत्रिकाधारक, वैद्यकीय प्रमाणपत्र,पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इ. आवश्यक कागदपत्रे नगरपरिषद कार्यालयात जमा करावीत.
सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी सांगोला नगरपरिषदेच्या कर निरीक्षक श्री. रोहित गाडे व श्री. सचिन पाडे यांच्याशी संपर्क साधावा.