क्रीडा

IND vs NED T20 World Cup: विराट-सुर्यकुमारची शानदार खेळी!

भारताचा दुबळ्या नेदरलँड्सवर ५६ धावांनी दणदणीत विजय

आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होत असून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या सामन्यात त्याने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग-११ मध्ये कुठलाही बदल केला नाही. भारतीय गोलंदाजीपुढे नेदरलँड्सने सपशेल शरणागती पत्करली. टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला. या विजयात भारतीय फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत संघाचा विजय सोपा केला. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार ठरला त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

गुरुवारी सिडनीमध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून नेदरलँड्सविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२३ धावा करू शकला. सुपर-१२ फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव केला. नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना टीम प्रिंगल याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २० धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त कॉलिन एकरमन (१७), मॅक्स ओडौड (१६), बॅस डे लीड (१६) आणि पॉल व्हॅन मीकरन (१४) यांनीही दोन आकडी धावसंख्या करत संघाला विजयी बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यांच्या व्यतिरिक्त नेदरलँड्सच्या एकही खेळाडूला दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही.

भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. या विजयासह टीम इंडिया सुपर-१२ फेरीच्या ग्रुप-२ मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारताचे दोन सामन्यांत दोन विजयांसह चार गुण आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा संघ दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढचा सामना आता दक्षिण आफ्रिकेशी पर्थमध्ये ३० ऑक्टोबरला होणार आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. विराट कोहली ४४ चेंडूत ६२ धावा करून नाबाद राहिला आणि सूर्यकुमार यादव २५ चेंडूत ५१ धावा करून नाबाद राहिला. कोहलीने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी सूर्यकुमारने सात चौकार आणि एक षटकार लगावला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत ९५ धावांची भागीदारी झाली. शेवटच्या पाच षटकांत भारताने एकही विकेट न गमावता ६५ धावा केल्या. कोहली-सूर्याशिवाय रोहित शर्माने ३९ चेंडूत ५३ धावा केल्या. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचवेळी केएल राहुल सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. त्याला १२ चेंडूत नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात राहुलला केवळ चार धावा करता आल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!