महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी? विधानसभेविषयी मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले? वाचा
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
या आढाव्यासाठी आयुक्तांनी सर्व सरकारी संस्था आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. आयुक्त राजीव कुमार यांनी ११ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर आज शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले. यावेळी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला महत्वाच्या सूचना केल्या.
निवडणुकीसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, ‘आम्ही महाराष्ट्र दौऱ्यात ११ पक्षांसोबत चर्चा केली आहे. आम्ही आमचा महाराष्ट्र, आमचं मतदान, अशी टॅगलाइन घेण्यात आली आहे. दिवाळी, देव दिवाळी यासारखे सण-उत्सव आहेत. त्या गोष्टी पाहूनच निवडणुकीची घोषणा करावी. निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना लागोपाठ सुट्ट्या येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आठवड्यातील मधल्या दिवशी निवडणुका घ्याव्यात. जेणेकरुन लोक सुट्ट्या घेऊन बाहेर जाऊ नयेत. लोकांनी मतदान करावे’.
मतदान केंद्रावर सोयी सुविधा देण्याची मागणी काही पक्षांनी केली आहे. बूथ एजंट त्याच भागातील असण्याऐवजी मतदारसंघातील ठेवण्याची मागणी पक्षांनी केली आहे. २६ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्याआधी राज्यात विधानसभेच्या निवडणुका व्हायला हव्यात, असेही त्यांनी सूचित केले.
‘महाराष्ट्रात १०० वर्षांवरील मतदारांची संख्या ४९ हजार इतकी आहे. महाराष्ट्रात एक लाख ८६ हजार मतदान केंद्र असतील. शहरी आणि ग्रामीण भागात जवळपास सारखीच मतदान केंद्रे असतील. मतदान केंद्रावर मोठ्या रांगा टाळण्यासाठी दिशादर्शक ठेवणार आहोत. रांगेतल्या मतदारांना बसण्यासाठी खुर्च्याही उपलब्ध करुन देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
कुलाबा, कल्याण, पुणे, कुर्ला या विधानसभा मतदारसंघात कमी मतदान होतं. यामुळे लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं. जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान महाराष्ट्रात काही भागात होत आलंय. यामुळं मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे. नागरिकांनी आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी मतदारांनी घराबाहेर पडावे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांना आवाहन केलं.