सांगोला तालुक्यात माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेचे बारा ते अठरा वयोगटातील किशोर किशोरीसाठी किशोर किशोरी विकास वर्ग सुरु आहेत. ग्रामीण भागात किशोर किशोरींना या वर्गाची अत्यंत गरज भासते. त्यांना मार्गदर्शन मिळावे व पुढील पिढी ही सुजाण नागरिकाची घडावी यासाठी किशोर-किशोरी वर्ग सुरु करणे गरजेचे आहे.
समाजातील वाढती गुन्हेगारी, विद्यार्थ्यांची आत्महत्येचे प्रमाण, मुलांमधील वाढते व्यसनांचे प्रमाण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, लैंगिक शोषण, अशा अनेक नवीन पिढीच्या नवीन समस्या, आपल्याला रोज दिसून येतात. या समस्या पासून आपल्या मुलांना कसे दूर ठेवायचे तसेच या अशा समस्यांमध्ये आपली मुले गुरफूटू नये यासाठीच कार्यशाळा घेवून किशोर किशोरी विकास वर्ग घेणाऱ्या शिक्षिकांना प्रशिक्षित केले गेले असे संस्थेचे किशोरी वर्ग सांगोल्याच्या आसपासच्या गावातून सुरु आहे.
सोनंद तेथील ‘सावित्रीबाई फुले हायस्कूल’ मधील इ. ५ वी ते ८ वी मधील मुलींसाठी मासिक पाळी संदर्भात ‘कळी उमलताना’ हा कार्यक्रम सोमवार दि. ३०/९/२०२४ रोजी घेण्यात आला. माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला संस्थेच्या कार्यकर्त्या सौ संपदा दौडे यांनी व्हिडीओ क्लिप द्वारे मासिक पाळी संदर्भात शास्त्रोक्त माहिती सांगितली. त्यामध्ये मुलींचे आरोग्य, स्वच्छता, आहार, शिक्षणाचे महत्व, शरीरात होणारे शारीरिक व भावनिक बदल यासंबंधी माहिती सांगून किशोरी वयामध्ये आपली आईच आपली चांगली मैत्रीण असू शकते असे सांगितले. तसेच मर्यादेचे पालन करणे, भिन्नलिंगी आकर्षण याबाबत मार्गदर्शन केले.
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती माधवी देशपांडे यानी किशोरीना संस्थेत चालणाऱ्या उपक्रमांची माहिती सांगितली. तसेच शिक्षक, समाजातील इतर अनोळखी व्यक्ती, वडील, भाऊ, मित्र यांच्याशी हाताचे अंतर ठेवूनच आपली वर्तणूक असली पाहिजे असे सांगितले. तसेच किशोरी शिक्षिका सौ. सविता कोळसे-पाटील व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेडसाळे मॅडम यांनीही मुलींना आपला पेहरावा कसा असावा, लक्ष वेधून घेणारी वागणूक नसावी याबाबत मार्गदर्शन केले.
मुलीनी आपल्या मनोगतातून या कार्यक्रमातून उपयोगी माहिती मिळाल्याचे व्यक्त केले. एकूण ६५ मुलीनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.