पाचेगांव खुर्द येथे मराठा साखळी आमरण उपोषण सुरू प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने समाजातून तीव्र नाराजी

पाचेगांव/प्रशांत मिसाळ:
अंतरवली सराटी येथे मराठा क्रांतिसूर्य मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. परंतु उपोषणकर्त्यांकडे प्रशासनातील कोणताही अधिकारी फिरकला नसल्याने व प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने पाचेगांव खुर्द येथील सकल मराठा समाजातून प्रशासनाबद्दल तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची प्रेरणा घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाचेगांव खुर्द येथे शनिवार पासून साखळी उपोषण करण्यात आले होते. परंतु काल रविवार दि 29 पासून साखळी उपोषणाचे आमरण साखळी उपोषणात रूपांतर करून गावातील नवनाथ यादव, पृथ्वीराज मिसाळ, मुन्ना मिसाळ या तीन मराठा तरुणांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही साखळी आमरण उपोषण सोडणार नाही असे मराठा समाजातील तरुणांनी सांगितले.
दरम्यान सांगोला तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाचे अरविंद केदार आणि त्यांचे सहकारी मराठाबंधु यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी बोलताना अरविंद केदार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाज कार्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली व उपस्थित मराठा बांधवांना आंदोलनाची दिशा समजावून सांगितली.