समाजातील असाक्षरांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जिल्हयातील सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी प्रोत्साहन देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी(योजना) सुलभा वटारे यांनी केले आहे.
राज्यात केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यात व्यापक प्रमाणावर नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणावर नव भारत साक्षरता कार्यक्रमाची जनजागृती केली जावी. सन 2011 च्या जनगणनेनुसार, देशातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील निरक्षरांची संख्या 25.76 कोटी आहे. त्यातील पुरूष 9.08 कोटी आणि 16.68 कोटी महिला आहेत. सन 2009-10 ते 2017-18 दरम्यान राबविण्यात आलेल्या साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत 7.64 कोटी एवढे साक्षर झालेल्या व्यक्तींच्या प्रगती अहवालाचा विचार करता, सध्या देशात सुमारे 18.12 कोटी लोक अजूनही निरक्षर आहेत. तसेच एकटया सोलापूर जिल्हयातील निरक्षरांची संख्या असाक्षर पुरूष- 3,29,794 व स्त्रीया- 4,94,690 असे एकूण – 8,24,484 असून हे प्रमाण (निरक्षरतेचे) एकूण लोकसंख्येच्या 8.4 इतके आहे. सन 2023-24 पर्यंत सोलापूर जिल्हयास 44,917 इतके उदिष्ट होते, त्यातील 17,432 एवढे उदिष्ट पूर्ण झालेले आहे. तसेच सन 2024-25 मध्ये असाक्षर पुरूष- 14100, स्त्री- 21150 असे एकूण- 35250 साक्षर करणेचे उदिष्ट पूर्ण करावयाचे आहे. असेही शिक्षणाधिकारी(योजना) सुलभा वटारे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा हा राज्यातील बहूभाषिक जिल्हयांपैकी एक आहे. त्यामुळे आपल्या जिल्हयात जे अजूनही असाक्षर आहेत, त्यांना नवसाक्षर करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने नवरात्रोत्सवात केंद्र पुरस्कृत उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जिल्हयातील सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी आपल्या सार्वजनिक मंडळाच्या वतीने नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आपण साक्षरतेवर आधारित पोस्टर्स, बॅनर्स, उदबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाटये, नाटिका इत्यादी मार्फत जनजागृती करून साक्षरतेचे महत्त्व सर्व जनमाणसांत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या या सक्रिय सहभागामुळे राज्यात केंद्र पुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा साक्षर होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवाहनपत्राव्दारे व्यक्त केला