सांगोला महाविद्यालयाकडून मेडशिंगी गावची स्वच्छता

सांगोला (प्रतिनिधी): भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, यांच्या निर्देशानुसार दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2024 “स्वच्छता हीच सेवा” ही मोहीम राज्यभर राबविली जात आहे. `महात्मा गांधी यांना अपेक्षित असणारा भारत घडविण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. आपला देश स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी स्वच्छते विषयी जनजागृती करणे आवश्यक आहे त्याचाच भाग म्हणून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. महात्मा गांधीना अपेक्षित असणारे स्वच्छ व सुंदर गाव बनवण्याकरिता सांगोला महाविद्यालय सांगोला राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून दत्तक गाव मौजे मेडसिंगी येथे 01 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत, शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे त्यामुळे गावातील मंदिरांची स्वच्छता करणे जरुरी होते. म्हणून रा.से.यो. च्या स्वयंसेवकांनी गावातील मंदिर परिसराची स्वच्छता केली. गावातील मरीआई माता मंदिर, हनुमान मंदिर, अबिका माता मंदिर परिसरातील गवत, केर-कचरा, प्लास्टिक गोळा करून ते नष्ट केले. त्याच बरोबर मेडशिंगी गावातील मुख्य रस्ता झाडून त्याची स्वच्छता करण्यात आली. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. विद्या जाधव व शिक्षेकेतर कर्मचारी श्री. महादेव काशीद यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मेडशिंगी गावाचे सरपंच श्री. प्रतापसिंह इंगोले यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्यामुळे हा उपक्रम सहज संपन्न झाला राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सर्व सदस्यांचे सहकार्य या उपक्रमास प्राप्त झाले.