डॉ.गणपतराव देशमुख जीवन गौरव पुरस्कारामुळे समाज कार्यास प्रेरणा- प्रा.झपके

सांगोला (प्रतिनिधी):-कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे संस्कार, विद्यामंदिर परिवारातील सदस्यांचे प्रेम व वाड वडीलांचे आशीर्वाद यांच्या मुळे समाज कार्याची गोडी लागली, त्यामुळे लायन्स क्लब, नगर वाचन मंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषद व अन्य क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली, पुरस्कार मिळत गेले. कोणतीही व्यक्ती पुरस्कारासाठी काम करत नसते. कामामुळे पुरस्कार मिळत जातात.मात्र.पुरस्कारामुळे काम करण्यास अधिक उमेद प्राप्त होते, प्रेरणा मिळत जाते असे विचार प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी व्यक्त केले.
सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. प्रा. झपके याना नुकताच डॉ.गणपतराव देशमुख यांच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सरांना मिळाल्याबद्दल सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुप मधील सर्वात तरुण सदस्य सेवानिवृत्त प्राचार्य नारायण विसापूरे व भीमाशंकर पैलवान यांचे हस्ते सरांचा शाल,बुके व फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
झपके सर हे ग्रुप मधील ज्येष्ठ सदस्यांचे विद्यार्थी, काही सदस्यांचे श्रद्धास्थान व गुरुवर्य तर काही सदस्यांचे मित्र आहेत. सरांना मिळालेल्या पुरस्काराची संख्या पन्नास पेक्षा जास्त झाली आहे. या मध्ये गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी व विभागीय ,प्रांतिक स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.या मध्ये शिक्षण क्षेत्र, सहकार, सामाजिक क्षेत्र, वीरशैव लिंगायत संप्रदाय या सह अनेक क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी सांगोला तालुक्यातील शिक्षणप्रेमी जनतेची व तमाम विद्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे ,असे प्रतिपादन प्रा.राजेंद्र ठोंबरे यांनी प्रास्ताविकात केले.
सदर कार्यक्रमास संस्था सचिव व ग्रुप चे ज्येष्ठ सदस्य म.श.घोंगडे, संजीव नाकील, सुभाष महिमकर, बाळासाहेब वाघमारे, अमर गुळमिरे, कमलाकर महामुनी, सुधाकर म्हेत्रे, प्रकाश धोत्रे, प्रकाश होनराव, प्रा.उत्तम घाटुळे, तायाप्पा आदट, नारायण राऊत आदि उपस्थित होते.