जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शिष्टाईमुळे धनगर समाजाचे आंदोलन स्थगित

 

*जिल्हाधिकारी यांच्याकडून कडून धनगर समाजाच्या तीन पैकी दोन मागण्या पूर्ण, एक मागणी शासन स्तरावरील

*धनगर समाजाच्या शिष्टमंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद

 धनगर समाजाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आषाढी एकादशीच्या शासकीय पूजा वेळेस आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे धनगर समाजाच्या शिष्ट मंडळाशी त्यांच्या विविध मागण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली.

शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करणे, दुसरी मागणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सांस्कृतिक भवनसाठी जागा व त्यासाठी निधीची तरतूद, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी बिना व्याजी व विना कारण तीस लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणे अशा तीन मागण्या केल्या.

शिष्ट मंडळाच्या तीन मागण्या पैकी पहिल्या दोन मागण्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ मान्य केल्या व तिसरी मागणी ही शासन स्तरावरील असून त्याबाबत शासनाशी चर्चा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी शिष्टमंडळाच्या प्रतिनिधीला सांगितले. व उपरोक्त दोन मागण्या मान्य करून पुढील एका महिन्याच्या आत त्या पूर्ण होणार असल्याने धनगर समाजाने आषाढी एकादशीला करण्यात येत असलेले आंदोलन मागे घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

या सर्व पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या शिष्टमंडळांतील उपस्थित प्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिष्ट मंडळाच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य केल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी ही सकारात्मक भूमिका स्वीकारून तूर्तास आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीनंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुनसिंह भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे तर धनगर समाज शिष्टमंडळाचे विश्रांती भुसनर, माऊली हलनवर, आदित्य फत्तेपूरकर, सुभाष मस्के, सोमनाथ ढोणे, पंकज देवकाते, प्रशांत घोडके, संजय लवटे, प्रसाद कोळेकर, अजय देशमुख, सतीश लवटे व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button