स्पर्धा परीक्षेतील यशासाठी मराठी विषयही महत्वपूर्ण – रंगनाथ सुंबे

सांगोला (वार्ताहर) मराठी भाषा ही आपली मायबोली असली तरी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करत असताना मराठी भाषेतील बारकावे व व्याकरण, तर्कशुद्ध पद्धतीने उपयोजित लेखनाची मांडणी तितकेच महत्त्वपूर्ण असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे सहकार्यवाह रंगनाथ सुंबे यांनी सांगोला विद्यामंदिर येथे आयोजित मराठीचे कार्यात्मक व्याकरण या विषयावर मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव म.शं. घोंगडे सर व उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते सर उपस्थित होते.
इयत्ता दहावीच्या टॉपर्स व आठवी शिष्यवृत्तीच्या विद्यार्थी व शिक्षकांना उपयुक्त मराठी विषयासंदर्भात मार्गदर्शन करताना रंगनाथ सुंबे यांनी विद्यार्थ्यांना सहज पचनी पडेल असा सोप्या भाषेमध्ये मराठी भाषेतील व्याकरणापैकी प्रयोग, उद्देश-विधेय, वृत्त-अलंकार, वर्णमाला-संधी इत्यादी घटकांचे विश्लेषण केले. म्हणी-वाक्प्रचार यांचा वापर करत विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचा अभ्यास कसा करावा या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.ज्या पद्धतीने विद्यार्थी गणित-विज्ञान या विषयाकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देतात तेवढेच लक्ष विद्यार्थ्यांनी मराठी विषयाकडे दिल्याचे दिसत नाही परंतु मराठी हा विषय सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा असून पुढे बोलताना संस्थेमार्फत शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम व शालेय शिस्त याबद्दल सुंबे सरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख प्रशांत रायचुरे व वैभव कोठावळे यांनी करून दिली तर आभार दादासाहेब वाघमोडे यांनी मानले.
याप्रसंगी पर्यवेक्षक अजय बारबोले, संस्था बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे, स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करणारे व मराठी विषयाचे सर्व अध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.