सांगोला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. श्रीकांत वासुदेव भोसेकर यांचे निधन; आज अंत्यसंस्कार
सांगोला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, सांगोला शहर व तालुक्यात प्रसिध्द असलेले डॉ. श्रीकांत वासुदेव भोसेकर यांचे काल मंगळवार दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सांगोला शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे इतके होते.
सांगोला शहर व तालुक्यात ४० ते ४५ वर्षे लाखो रूग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार व रोगनिदान करून योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील भिष्मपितामह म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक डॉक्टर मुलगा असा परिवार आहे. डॉ. इशान भोसेकर यांचे ते वडील होत.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान होते. तसेच सांगोला शहराच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.स्व.भाई.आ.गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगोला शहर व तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.