सोलापूर जिल्ह्यात मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रि अनुज्ञप्त्या बंद
– भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी अधिसूचनेद्वारे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्हयात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. सदर विधानसभा मतदार संघांमध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान व दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने, या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी जिल्हयातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री, परमिट रूम व ताडी माडीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजलेपासून पुढे (मतदान संपण्याच्या 48 तास आगोदर), दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस, दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा संपुर्ण दिवस व दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्यात यावीत.
महाराष्ट्र देशी दारु नियम, 1973 च्या नियम 26 (1) (सी) , मुंबई विदेशी मद्य नियम, 1953, विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम, 1952 चा नियम 5 (10) (B) (c) (1) तसेच महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवहया इत्यादी), नियम 1969 च्या नियम 9 ए (सी) (1), महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदणे) नियम, 1968 मधील तरतूदी नुसार जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांनी निवडणूक क्षेत्रातील अबकारी अनुज्ञप्त्या मद्य विक्रीकरीता पूर्णपणे बंद ठेवाव्यात. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 व त्याअंतर्गत असलेल्या नियमातील तरतूदीनुसार तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल व संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहेत.