मिरज रेल्वे गेट बोगद्याखाली मोठ्या प्रमाणात चिखल; आपुलकी प्रतिष्ठान सदस्यांनी हातात घेतले पाटी आणि खोरे!
मिरज रेल्वे गेट बोगद्याखाली मोठ्या प्रमाणात चिखल साठल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याची माहिती मिळताच आपुलकी प्रतिष्ठान व शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या सदस्यानी शुक्रवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यावरील संपूर्ण चिखल हटवला. सांगोला मिरज रस्त्यावरील मिरज रेल्वे गेट बोगद्यात नेहमीच पाणी साठत असून चिखलही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या चिखलात घसरून नेहमीच अपघात होत आहेत .
बुधवारी सायंकाळी एक महिला गाडीवरून पडून गंभीर जखमी झाली त्याचबरोबर गुरुवारी रात्रीही एक वाहन चालक घसरून पडल्यामुळे तो आणि त्याचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती गुरुवारी रात्री आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांना समजताच त्यांनी आपुलकी प्रतिष्ठानच्या ग्रुपवर सदस्यांना स्वच्छता मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अच्युत फुले यांनाही संपर्क साधून या संदर्भात माहिती दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव सचिव संतोष महिमकर, आपुलकी सदस्य तथा शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अच्युत फुले, आपुलकी सदस्य प्रमोदकाका दौंडे, वसंत सुपेकर, सोमनाथ सपाटे सर, दत्तात्रय नवले, दत्तात्रय खटकाळे, रविंद्र कदम, संदेश पलसे, अरविंद डोंबे गुरुजी यांनी या रस्त्याची स्वच्छता करून चिखल बाजूला सरकवला. नगरपालिकेचे अक्षय गायकवाड, सोमा बनसोडे, सुरज शेख यांनीही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून स्वच्छता करून घेतली आणि ट्रॅक्टर मध्ये चिखल भरून त्याची विल्हेवाट लावली.
. एकीकडे दिवाळीची लगबग सुरु असताना केवळ अपघाताची मालिका सुरू असल्यामुळे याची दखल घेत आपुलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी खोऱ्या आणि पाटी हातात घेऊन श्रमदान करून एक वेगळा उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक होत आहे.