सन्मान केल्यामुळे चालकांना प्रोत्साहन मिळेल- राजेंद्र यादव

सांगोला ( प्रतिनिधी )- चालक दिनानिमित्त चालकांचा सन्मान होत असल्यामुळे एस. टी. चालकांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल असे मत आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
सांगोला बस आगारात बुधवारी चालक दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी राजेंद्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आगार व्यवस्थापक विकास पोफळे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक पृथ्वीराज पारसे, वाहतूक निरीक्षक सागर कदम, सहाय्यक वाहतूक निरीक्षक समाधान काशीद, वरिष्ठ लिपिक आशिष सूर्यवंशी आदीसह आगारातील चालक, व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र यादव म्हणाले की, जनमाणसात एस. टी. ची एक आगळी वेगळी प्रतिमा असल्यामुळे प्रवाशांचा एस.टी. कडे अधिक कल आहे. चालकही आपले काम चोख पार पाडत असल्यामुळे विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांची संख्या सांगोला आगारात अधिक आहे. अशा चालकांचा सन्मान चालक दिनानिमित्त होत असल्यामुळे यापुढील काळात चालकांना आपली सेवा देण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे.
यावेळी बोलताना आगार व्यवस्थापक विकास पोफळे म्हणाले की, प्रवासी सुरक्षा बाबत एसटी नेहमीच दक्षता बाळगत आली आहे, यामुळेच निर्धास्त आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटी शिवाय अन्य पर्याय नाही. प्रवाशांच्या मनातील आश्वासक प्रतिमा जपणे आणि ती वृद्धिंगत करणे याची जबाबदारी चालक बंधूवर आहे. यावेळी सागर कदम यांनीही चालकांना शुभेच्छा दिल्या तसेच ११ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान सुरक्षितता सप्ताह तसेच १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान इंधन बचत मासिक अभियान चालू असल्याची माहिती दिली.
यावेळी विना अपघात सेवा देणाऱ्या व कमी इंधनात जास्त अंतर बस चालवणाऱ्या चालकांचा सन्मान प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यकमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक प्रताप टकले यांनी केले.