स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल २० वर्षानंतर झाल्या गाठीभेटी

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेजमध्ये सन २००४ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला.सदर स्नेह मेळावा सांगोला येथील वासुद रोडवरील हॅपी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकमेकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
स्वागत सोहळ्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने आपापली ओळख करून दिली व मनोगत व्यक्त केले. मनोगतात प्रत्येकाने प्राथमिक व माध्यमिक शाळेतील आपापले अनुभव व चालू वाटचालीबद्दल मनोगत कथन केले. त्यानंतर संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी स्नेहभोजन झाल्यानंतर उपस्थित डॉक्टर यांनी चालू वयात शरीराची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली. अशाप्रकारे अत्यंत खेळीमेळीच्या, आनंदमय व उत्साहवर्धक वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती ती मदत आपण केली पाहिजे. मात्र मदत करताना आर्थिक हितसंबंध येता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते असे विचार माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मांडत एकमेकांना अडीअडचणींना मदत करण्याचे यावेळी ठरले.