मतदानापूर्वीच माझ्या सारख्याची आई बहिण काढली जाते, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे- डॉ.बाबासाहेब देशमुख
सांगोला(प्रतिनिधी):विरोधक आता सांगत आहेत की बाबासाहेबाचे नाव मतदार यादीत आता आले, एवढ्यावरच न थांबता मतदानापूर्वीच माझ्या सारख्याची आई बहिण काढलेली आहे.ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे असे सांगत 30 वर्षे तुम्ही तालुक्याच्या राजकारणात काम करता, तुमच्या 30 वर्षातील 5 ठोस कामे दाखवा की त्या कामामुळे जनतेला फायदा झाला, त्यानंतर बघू मी कधी आलो आणि माझे नाव कधी आले असा सवाल डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित करुन सर्वसामान्य जनता हीच आबासाहेबांच्या विचारांची वारसदार असल्याचे सांगून विरोधकांनी बोलताना विचार करुन बोलावे, अशी विनंती केली.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ घेरडी येथे भव्य कॉर्नरसभा संपन्न झाली. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते.व्यासपीठावर डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासह मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, 90 व्या वर्षी आजारी असताना स्व.आबासाहेबांना मी मुंबईमध्ये दवाखान्यात घेऊन गेलो होतो. नव्वदाव्या वर्षी सुध्दा आबासाहेब स्वत:चे कपडे स्वत:धुवत होते हे मी पाहिले आहे, त्यांनी स्वत:च्या नातवाला सुध्दा कपड्याला हात लावू दिला नाही, त्यामुळे मी सेवा केली म्हणणार्यांनी आपण काय बोलतो याचा विचार करा असा टोला लगावत शेवटच्या काळामध्ये दृष्टी कमी झाली होती. चालत असताना सुध्दा कोणाच्या तरी हाताला धरुन आधार घेतला नाही, आयुष्यभर आबांनी स्वावलंबी जीवन जगले, त्यामुळे तुम्ही कसली सेवा केली? असा सवाल उपस्थित केला.
आबासाहेबांच्या विचारांचे आम्ही वारसदार होतो, जनता हीच आबासाहेबांच्या विचारांची खरे वारसदार आहे पण तुलना करा, आबासाहेब आयुष्यभर निष्कलंक जीवन जगले, चारित्र्याला एकही डाग लागू दिला नाही.आणि तुमच्याकडे या दोन गोष्टी कुठे आहेत. बोलताना तुलना तर करा आपण काय बोलतो? असे सांगत तालुक्यात दोघांनी मलिंदा गँग तयार केली. ठराविक लोकांना कामाच्या माध्यमातून निधी दिला.आणि त्या निधीतून टक्केवारी घेऊन स्वत:चा विकास केला. 60 वर्षात राजकारण करत असताना बरेच ठेकेदार आबासाहेबांसोबत काम करत होते. परंतु कुणीही सांगावे, ज्या ज्या वेळेस आबासाहेबांकडून कामे दिली गेली; त्यावेळी कामाच्या माध्यमातून आबासाहेबांनी काही मागितले किंवा टक्केवारीच्या माध्यमातून एखादी गोष्ट मागितली की, जर असा एखादाही ठेकेदार या तालुक्यात कोणी दाखवला तर आम्ही राजकारण सोडू असे सांगितले.
त्याचप्रमाणे पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, एवढे सोप्यात पाणी आले नाही. असे सांगत टेंभू म्हैसाळ योजनेचे पाणी 2019 पूर्वीच आले.आणि त्या पाण्याच्या माध्यमातून तालुक्यातील 70 टक्के ओलिताखाली आल्या, पाणी आणण्यासाठी आबासाहेबांनी व स्व.नागनाथआण्णांनी जनतेला सोबत घेऊन 30 वर्षे पाणी परिषदा घेतल्या आणि त्यानंतर पाणी आले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, ज्यांना पक्ष, जनतेशी बांधिलकी नाही, विचार, निष्ठा नाही, अशा गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका, त्यामुळे या निवडणुकीत बदलाची भावना ठेवून जिद्दीने काम करुन सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकासआघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांना निवडून द्या.असे आवाहन अनेक मान्यवरांनी केले. यावेळी तरुण कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास हा विद्यमान लोकप्रतिनिधींच्या खिशात आहे………
यावेळी डोंगरगाव, सोनंद, गळवेवाडी, हंगिरगे, नराळे , भोपसेवाडी,तरंगेवाडी, डिकसळ येथील प्रस्थांपिताकडून दिलेला बोगस निधी वाचून दाखवित त्यांनी केलेला विकास आता आपल्या शोधण्याची वेळ आली आहे. विकास हा विद्यमान लोकप्रतिनिधींच्या खिशात आहे. हा खिशाच फाडायचे काम सांगोल्याची तालुक्याची जनता आता नक्कीच करेल असे सांगत डॉ.बाबासाहेब देशमुख यांना बहुमताने विजयी करा.
डॉ.सुदर्शन घेरडे