सांगोला/ प्रतिनिधी: मेडशिंगी गाव हे परिवर्तनाच्या बाबतीत अग्रेसर आहे. 2019 च्या निवडणुकीत आमदार शहाजी बापू पाटील यांना मेडशिंगी येथील भाऊसाहेब रुपनर कुटुंबीयांनी जाहीर पाठिंबा देत निवडणूक पार पाडली . त्या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांचा ऐतिहासिक विजय झाला. या विजयामध्ये रुपनर कुटुंबातील बंधूंचे योगदान मोठे आहे. या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मेडशिंगी येथील रुपनर कुटुंबीय व फॅबटेक उद्योग समूह उद्धव बाळासाहेब ठाकरे(उबाठा) यांच्या शिवसेना पक्षासोबत जाणार नसून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शहाजीबापूंना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार अशी ग्वाही मेडशिंगी गावचे माजी सरपंच संजयनाना रुपनर यांनी मेडशिंगी येथे दिली.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या कॉर्नर सभेप्रसंगी मेडशिंगीचे माजी सरपंच संजयनाना रुपनर हे बोलत होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी मेडशिंगी गावासाठी 20 कोटी रुपयांचा निधी दिला असून भाऊसाहेब रुपनर कुटुंबीय हे सदैव आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी राहील व त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असे आश्वासन संजयनाना रुपनर यांनी या सभेप्रसंगी दिले.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या मनोगत सांगितले की , मेडशिंगी हे गाव राजकारणाचे महाद्वार आहे. मी राजकारणात आलो ते केवळ आमदारकीसाठी नसून तालुक्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आलो. राजकारणात दिलेला शब्द पाळण्याचे काम मी केले आहे. तालुक्यातील एक ही गाव शेतीच्या पाण्यापासून व पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले नाही. येत्या वर्षभरात सर्वच विकासकामे पूर्ण होतील व सांगोला तालुक्याचा सर्वांगीण व परिपूर्ण विकास झालेला पाहायला मिळेल तालुक्याच्या विकासासाठी व तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तसेच उद्योगधंदे व मोठी एमआयडीसी तालुक्यात आणण्यासाठी मला या निवडणुकीत आमदारकीची संधी द्या. राज्यात महायुतीचे सरकार येणार असून मला मंत्रीपदाची संधी मिळेल असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, भीमशक्तीचे विजय बनसोडे, ओंकार शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील, रामलिंग झाडबुके, दीपक दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेसाठी मोठ्या प्रमाणात आजी-माजी पदाधिकारी मान्यवर व मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.