शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार- आ.शहाजीबापू पाटील
आ.शहाजीबापू पाटील यांचेकडून संगेवाडी व मांजरी या गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील चार मंडळांमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. ही चार मंडळ सोडूनही इतर मंडळांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे या चार मंडळासह इतर मंडळांमध्येही ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व पिकांचे पंचनामे करण्यात येतील.ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखे परिस्थिती तालुक्यातील फक्त चार मंडळांमध्येच आहे. ओला दुष्काळासाठीचे अनेक नियम व निकष आहेत. आम्ही तशी मागणी करू परंतु शेतकर्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. पंचनामे करण्यापासुन कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत दखल घ्यावी अशा सूचनाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी आधिकार्यांना केल्या.
सांगोला तालुक्यातील सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या संगेवाडी मंडळमधील संगेवाडी व मांजरी या गावात नुकसानग्रस्त पिकांचे पाहणी करण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील आले होत. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार अभिजीत पाटील, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, मंडलाधिकारी बाळासाहेब कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रविण झांबरे, कृषिसेवक अलका चव्हाण यांच्यासह मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की, तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या चार मंडळ व इतर मंडळामध्येही नुकसान झालेल्या पिकांचे सर्व पंचनामे केले जातील. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे दहा गुंठेही जमीन राहणार नाही. केंद्र सरकारच्या पीकनिहाय निकषानुसार नुकसान भरपाई जाहीर केली जाते त्यापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे शिंदे – फडणवीस सरकारचे देण्याचे धोरण असल्याचे सांगत कोणताही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही याची दखल निश्चितपणे घेतली जाईल असे आश्वासन आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अधिकार्यांना पंचनामेबाबत आमदार शहाजीबापू पाटील यांनी सूचना केल्या.