“इतकी बदनामी करुनही राणांवर का फिदा आहात?,” बच्चू कडूंची शिंदे सरकारला विचारणा, म्हणाले “तुमचा अपमानच…”
सत्ताधारीच अशाप्रकारे बदनामी करत असतील तर कशाला त्यांच्यासोबत राहायचं? कार्यकर्त्यांचे बच्चू कडूंना मेसेज

राणांमुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार का फिदा आहे ते माहिती नाही असं विधान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाद मिटवण्यासाठी बच्चू कडू आणि रवी राणा यांना रविवारी रात्री ‘वर्षा’वर बोलावलं होतं. या बैठकीत जाण्यापूर्वी बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रवी राणांनी माफी मागण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं सांगितलं.
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
“आता आम्ही चर्चेला बसणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. चर्चा काय होते, समाधान काय होतं, त्यावर पुढचं ठरवलं जाईल. आमच्यावर झालेले आरोप फार गलिच्छ आणि खालच्या स्तराचे आहेत. त्यामध्ये कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आपण पुढचा निर्णय जाहीर करु”, असं बच्चू कडू यांनी बैठकीला पोहोचल्यानंतर सांगितलं.
“रवी राणा यांनी इतकी मोठी बदनामी केली आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. “१ तारखेला आंदोलन होणार आहे. तोडगा निघाला नाही तर आंदोलन होणारच. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ते आल्यानंतर निर्णय घेऊ”, असं ते म्हणाले.
“कार्यकर्त्यांचे मेसेज येत आहेत. तुमचा इतका अपमान होत आहे, तुम्ही इतकी बदनामी सहन केली, सत्ताधारीच अशा प्रकारे बदनामी करत असतील तर कशाला त्यांच्यासोबत राहायचं? असं त्यांचं म्हणणं आहे. ते बरोबरच आहे. त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाही”, असं बच्चू कडूंनी सांगितलं. “राणांमुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार का फिदा आहे ते माहिती नाही”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
बैठकीत तोडगा नाही?
‘वर्षा’ बंगल्यावर रात्री तब्बल अडीच तास बैठक चालली. मात्र अद्यापही या वादावर तोडगा निघाला नसून वाद कायम असल्याची माहिती आहे. त्यानंतर आज दोन्ही नेते ‘सागर’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका
“राणा आणि कडू यांच्यात वाद नसून तो गैरसमज आहे. आम्ही तो गैरसमज दूर करु. ५० खोके बोलणं चुकीचं आहे. कुठेतरी २७ कोटी पकडले तर एक ट्रक लागला, म्हणजे ५० कोटींना दोन ट्रक लागतील. मग ५० आमदारांच्या ५० कोटींना किती ट्रक लागतील याचा विचार करा. ते ट्रक कुठे आहेत? मी कोणालाही पैसे दिलेले नाहीत. सगळे स्वत:हून माझ्यासोबत आले आहेत,” असं एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितलं.