शेतात उडीद काढण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला तर अन्य एकाचा सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना बुधवार दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वा.च्या सुमारास सांगोला – जत महामार्गावरील लोणविरे फाटा येथे घडली आहे.
संजय नारायण बाबर -४० रा. सांडसमळा वाढेगाव ता सांगोला व शाम उर्फ धनाजी प्रकाश काशीद -३१ रा.सलगरे, मोरगाव ता क.मंहकाळ जि.सांगली अशी मृताची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की , मुळचे मानेगाव ता. सांगोला व सध्या वाढेगाव येथील रहिवासी संजय नारायण बाबर याची शेती मानेगाव येथे आहे. संजय बाबर व नातेवाईक धनाजी प्रकाश काशीद ( रा.सलगरे ,मोरगाव ता.कवठेमंहकाळ ) असे दोघेजण मिळून वाढेगाव येथून दुपारी एम एच -०९-बीएन-०८८२ या दुचाकीवरून सांगोला – कडलास मार्गे मानेगाव येथे शेतातील उडीद काढण्यासाठी निघाले होते दुचाकी संजय बाबर चालवीत होता तर धनाजी काशीद हा त्याच्या पाठीमागे बसला होता दरम्यान त्यांची दुचाकी लोणविरे फाट्या नजीक आले असता दुपारी दीड च्या सुमारास जत कडून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.या अपघातात धनाजी काशीद हा जागीच ठार झाला तर संजय बाबर याच्या डोक्यास व पायाला गंभीर मार लागल्याने अपघात स्थळी पडला होता
अपघाताची माहिती मिळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल बजरंग बोराटे व पोलीस नाईक अंकुश नलवडे यांनी खाजगी रुग्णवाहिका पाठवून गंभीर जखमी संजय बाबर यास उपचारा करता खाजगी रुग्णवाहिकेतून सांगोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा साळे यांनी पोलिसात खबर दिली आहे.