सांगोल्यात लाडक्या बहिणींचा मोठा पाठिंबा; डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी स्त्री शक्ती एकवटली

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि.23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. आता सांगोल्यात सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी महिला शक्ती एकवटली आहे. येऊन येऊन येणार कोण?आमच्या लाडक्या भावाशिवाय आहेच कोण….डॉ.बाबासाहेब देशमुख तुम आगे बढों हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा देण्यात आल्या. महिला भगिनींच्या या घोषणांनी सांगोला शहरासह ग्रामीण भाग अक्षरशः दुमदुमून गेला होता.
प्रचारादरम्यान सांगोला विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या स्वागतासाठी महिला भगिनी मोठ्या संख्येने औक्षण करण्यासाठी जमत आहेत.तसेच सांगोला तालुक्यातील डॉ.निकीताताई देशमुख याही डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारानिमित्त तालुक्यात फिरत आहेत. यावेळी डॉ.निकीताताई देशमुख यांचेसोबत महिला भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सांगोला तालुक्याच्या विकासासाठी रात्र झटणार्या या आमच्या भावासाठी आम्ही पूर्ण ताकतीने उभे राहणार असल्याचा संकल्प या महिला भगिनींनी व्यक्त केला.
गेल्या तीन वर्षापासून सांगोला तालुक्यासाठी दिवस रात्र झटणार्या या आमच्या भावाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर या सांगोला तालुक्यातील काही स्वार्थी लोकांनी एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या तालुक्यातील तमाम माता, भगिनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे काम करणार असल्याच्या भावना महिला भगिनी व्यक्त करत होत्या.