महाराष्ट्र
सांगोला तालुक्यात भव्य एमआयडीसी व उद्योगधंदे आणून तरुणांना रोजगार देणार: आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला /प्रतिनिधी: उद्याच्या पाच वर्षासाठी तालुक्याचा कारभार माझ्या हाती सोपवल्यास तालुक्याला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणले जातील. तालुक्यातील ऊसतोड कामगार, गोदीतील मजूर , दुष्काळी कामावरचा मजूर यांच्या भविष्याचा विचार करून तालुक्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ संपवण्यासाठी शेतीच्या पाण्याच्या योजना निकराने मार्गी लावल्या. तालुक्यातील एक गावही शेतीच्या पाण्यापासून वंचित ठेवले नाही. पिण्याच्या पाण्याची जलजीवन मिशन योजनाही मार्गी लावली. येत्या वर्षभराच्या काळात तालुक्यात भव्य एमआयडीसी व उद्योगधंदे आणून तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. त्यासाठी मतदारांनी पुढील पाच वर्षाकरिता मला आमदारपदाची संधी द्यावी. मी तालुक्यात नामदार म्हणून परत येईन असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी कोळा तालुका सांगोला येथील जाहीर सभेमध्ये व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर चेतनसिंह केदार सावंत, दादासाहेब लवटे,राजश्रीताई नागणे पाटील, संभाजीतात्या आलदर श्रीकांतदादा देशमुख, अजिंक्य शिंदे, सुमित करांडे , खंडू सातपुते, राजू गुळीग, दुर्योधन हिप्परकर, नवनाथभाऊ पवार, शिवाजीअण्णा गायकवाड, शिवाजी घेरडे, दीपक ऐवळे, अकोला येथील सभेसाठी अशोक शिंदे, पुण्यवान खटकाळे, पांडुरंग लिगाडे, डॉ. जयंत केदार, अनिल शिंदे, ॲड.विलास शिंदे ,गुंडादादा खटकाळे, वासुद येथील सभेसाठी विष्णुपंत केदार, सौदागर केदार, अनिल केदार, सेनापती केदार, विठ्ठल केदार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी ,मान्यवर आदी उपस्थित होते .
पुढे बोलताना आम. शहाजीबापू पाटील म्हणाले, स्व.गणपतराव देशमुख साहेबांचा खरा वारसदार शहाजीबापू राजाराम पाटील आहे. विरोधक माझ्या बंगल्याचा हिशोब करतात.त्यांच्याकडे किती बंगले आहेत हे मोजायला सापडत नाहीत. सांगोला तालुक्यात मोठी एमआयडीसी व वेगवेगळे मोठे उद्योग आणून येथील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी संकल्पना राबवणार आहे. पांडुरंगआबा भांबुरे यांनी मंजूर करून आणलेला साखर कारखाना चेअरमन दीपकआबांना दीर्घकाळ चालवला नाही. साखर कारखाना मोडीत काढला. हा कारखाना अभिजीत पाटलांकडून मी ताब्यात घेऊन चांगल्या पद्धतीने चालवून दाखवेन. भविष्यात तालुक्यात उत्पादित होणारा ऊस आपल्या तालुक्यातल्या कारखान्यांमध्ये गाळण्याचे माझे उद्दिष्ट आहे. उद्याची निवडणूक निर्णायक असून सर्वसामांन्यांच्या सन्मानाची आहे. तालुक्यातील सर्व समाजातील घटकांना मिळालेल्या ५ हजार कोटीच्या निधीतून लोकोपयोगी व समाज उपयोगी कामे केली आहेत. तालुक्यात विकासाची कामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भरभरून निधी दिला . सांगोला तालुका हा बारामती सारखा करून दाखवण्याची जिद्द माझ्याकडे आहे. भविष्यात उर्वरित विकास कामे व सर्वांगीण विकासासाठी इतर महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील मायबाप जनतेने या निवडणुकीत मोठे मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले, की केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे व विचाराचे सरकार असल्यास विकासामध्ये कोणतीही अडचण रहात नाही. मोठ्या प्रमाणात निधी आणून सर्वांगीण विकास करणे शक्य होते .सरकारने मुली व. महिलांसाठी अनेक योजना राबवल्या. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला १ हजार ५०० रुपये देऊन त्यांचा सन्मान केला आहे. शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी व समाजातील गोरगरीब घटकासाठी विकासाच्या योजना महायुती सरकारने राबवलेल्या आहेत .