दिव्यांग बांधवांविषयी आम्हाला सहानुभूती असून दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील- डॉ. सौ. निकिताताई बाबासाहेब देशमुख

सांगोला: नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व मी वैद्यकीय क्षेत्रात असल्याने दिव्यांग बांधवांविषयी आम्हाला सहानुभूती असून दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील, दिव्यांगाच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच उपलब्ध असू. दिव्यांग बांधवांनी खचून जाऊ नये. दिव्यांग हे सामान्यांपेक्षा कमी नसून सामान्यांपेक्षा अधिक सर्जनशील असतात, असे प्रतिपादन डॉ. सौ. निकिताताई बाबासाहेब देशमुख यांनी केले.
सांगोला नगरपरिषदेमार्फत ‘जागतिक दिव्यांग दिना’निमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे दिव्यांग बांधवांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांगोला नगरपरिषदेतर्फे शहरातील १४० दिव्यांगांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा दुसरा हफ्ता प्रत्येकी ६,०००/- रु. प्रमाणे एकूण ८,४०,०००/- रु. धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप डॉ. सौ. निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
निमंत्रित वक्ते श्री. नंदकुमार दुपडे यांनी दिव्यांग बांधवांनी आत्मविकास, जिद्द, प्रयत्न, सातत्य याद्वारे येणाऱ्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हावे असे सांगितले. यावेळी माजी नगरसेवक श्री. रमेश जाधव, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कार्यालयीन अधिक्षक श्री. सचिन पाडे यांनी केले.