उदय (बापू) घोंगडे व त्यांच्या परिवाराने स्वदुःख विसरत दातृत्व भावनेतून सामाजिक बांधिलकी जपली असून शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या शाळारुपी मंदिरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सढळ मदतीचा हात देत खऱ्या गरजवंताला सहकार्याचे धोरण अविरतपणे सुरू ठेवले व मुलाच्या स्मृती जपल्या ही खरी भारतीय संस्कृती आहे असे उद्गार ह.भ.प.डॉ.श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांनी कै.प्रणव उर्फ आकाश उदय घोंगडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित मोफत गणवेश वाटप व सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या सायकल बँकेस सायकल प्रदान समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संबोधताना काढले.
यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर,ऍड.गजानन भाकरे, प्रतिष्ठित व्यापारी आनंद (काका) घोंगडे यांच्यासह प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे उपस्थित होते.
पुढे बोलताना बोधले महाराजांनी नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत संस्कारांची जोपासणूक महत्वाची असून हे संस्कार रुजवण्याची महत्त्वाची भूमिका विद्यार्थीरुपी ओल्या पाटीवर या शाळेतील अध्यापकवृंद प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे बजावत असल्याबद्दल आनंद वाटल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी गतवर्षी घोंगडे परिवाराच्या माध्यमातून शुभारंभ केलेल्या सायकल बँकेमध्ये आणखी पाच नवीन सायकलींची वाढ करत गरजू विद्यार्थ्यांना सायकल्स व मोफत गणवेश मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष प्रातःस्मरणीय, परमपूज्य गुरुवर्य कै. चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्राचे मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पण करत पूजन करण्यात आले.प्रास्तविकातून प्राचार्य अमोल गायकवाड यांनी घोंगडे परिवाराने स्तुत्य हेतूने आयोजिलेल्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद करत विद्यार्थी मदतीबद्दल ऋण व्यक्त करुन मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी तर आभार उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गणवेश वाटप विभागाचे वैभव कोठावळे, राजेंद्र ढोले, उत्सव विभागाचे नरेंद्र होनराव यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी पर्यवेक्षक मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.