नाझरा विद्यामंदिर मध्ये मानसिक स्वास्थ्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

नाझरा(वार्ताहर):- विद्यार्थी दशेत असताना आपल्याला विविध प्रकारचा मानसिक ताण तणाव येत असतो, या तणावात आपण विचलित न होता प्रसन्न मनाने आपला अभ्यास करायचा असतो. सतत होणारी आपली चिडचिड हे आपले मानसिक आरोग्य ठीक नसल्याचे लक्षण आहे, त्यामुळे आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मानसिक स्वास्थ्य ठीक असेल तरच आपली शैक्षणिक प्रगती उच्च पातळीची होऊ शकते असे प्रतिपादन सांगोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संवाद मित्र स्वाती पवार यांनी केले.
नाझरा विद्यामंदिर प्रशालेत प्राथमिक आरोग्य केंद्र सांगोला यांच्यावतीने मानसिक आरोग्य जनजागृती कार्यशाळेमध्ये त्या बोलत होत्या.यावेळी नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील, वसंत गोडसे,दिलीप सरगर, संभाजी सरगर सोमनाथ सपाटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना निकिता पवार यांनी मानसिक आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या पद्धतीचे तोटे होतात, त्याचबरोबर मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
प्रचंड धावपळीच्या या जगात केवळ विद्यार्थ्यांचेच मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित असणे आवश्यक नसून शिक्षकांनीही आपला ताण तणाव बाजूला ठेवून अध्यापनाचे कार्य करावे जेणेकरून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आपल्या अध्यापनाचा प्रभावी वापर होऊ शकतो असे मत प्राचार्य बिभीषण माने यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार सोमनाथ सपाटे यांनी मांडले.