व्यवहारात गणिताला अनन्य साधारण महत्व- दिलावर नदाफ

नाझरा (वार्ताहर):-लहानपणापासूनच गणित विषयात विशेष रुची असणारे श्रीनिवास रामानुज यांनी विविध संशोधनातून गणिताच्या अनेक संकल्पना या जगासमोर मांडल्या. गणितात असणारी आकडेमोड आपल्या जगण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आहे.आपल्या जीवनात गणित विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणित विषयाशिवाय आपल्या जीवनातील कोणताही व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण होत नाही, त्यामुळे शालेय जीवनापासूनच गणित विषयातील रुची वाढायला हवी असे प्रतिपादन नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे गणित विषयाचे शिक्षक दिलावर नदाफ यांनी केले.
सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये श्रीनिवास रामानुज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी श्री. नदाफ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाजरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,ज्येष्ठ गणित शिक्षक विनायक पाटील,वसंत गोडसे,सोमनाथ सपाटे,मारुती सरगर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीनिवास रामानुज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रशालेतील विद्यार्थिनी किशोरी बाबर हिने श्रीनिवास रामानुज यांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.