बलवडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता संपन्न..

आपण प्रत्येक जण सुखी होण्यासाठी धडपड करत आहोत व त्यासाठी दैवी गुण अंगीकारले पाहिजेत व यासाठी ज्ञानोबा म्हणतात देवाला गवसणी घाला तो तुमच्या चित्तात बसल्याशिवाय राहणार नाही व परमार्थ करताना लोभ, मोहमाया सोडाच तर परमार्थात अवस्थेला महत्त्व दिले जाते व्यवस्थेला नाही व यासाठी नटणे सोडा व याची सुरुवात मी माझ्यापासूनच केली आहे व त्यामुळे परमार्थात असणे महत्त्वाचे आहे असे ह.भ.प. नवनीत महाराज करगणी कर यांनी बलवडी ता. सांगोला येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगता समारंभात काल्याच्या कीर्तनाप्रसंगी सांगितले.
तसेच घरात सुनेला मुलीचा दर्जा द्या व सासूला आईचा दर्जा द्या म्हणजे घरात सुख शांती लाभेल व आजपर्यंत सात कीर्तने झाली परंतु कालच्या कीर्तनात विशेष दर्जा आहे व हे स्वर्गात सुद्धा मिळत नाही ते येथे मृत्यू लोकातच मिळते. तसेच अडाणी आई घर वाया जाई असे नव्हे तर संस्कार हे तिच्याकडून मिळतात व सध्याच्या आईने चांगले शिक्षण घेऊनही संस्कार कमी पडतात व यासाठी परमार्थ करताना लाजू नका व पहाटेच्या काकडा आरतीस नाजरेतून महिला भक्तगण येतात तर सर्वांनी सामील व्हा व अध्यात्माबरोबर जगणे शिकवणे म्हणजेच कीर्तन होय असेही नवनीत महाराज यांनी यावेळी सांगितले.
सप्ताहात दररोज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, भागवत कथा, हरिपाठ व हरि कीर्तन सेवा संपन्न झाली. तसेच महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी बलवडी व परिसरातील असंख्य महिला, पुरुष, हरी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



