सांगोला लायन्स क्लब आयोजित नेत्र शिबिरामध्ये १२५ रुग्णांची तपासणी तर २० मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार

सांगोला ( प्रतिनिधी ) इंटरनॅशनल असोसिएशन लायन्स क्लब्ज ‘आम्ही सेवा देतो’ या ब्रीद वाक्याप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक वैद्यकीय,पर्यावरण व इतर अनेक क्षेत्रात कल्याणकारी कार्यात सहभाग घेत असते यानुसार सांगोला लायन्स क्लब गावागावात मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून गरजूंना त्यांच्या दारापर्यंत जाऊन आरोग्य विषयक सेवा देत असते.हा विचार प्रमाण मानून घेरडी येथील ग्रामस्थांनी सांगोला लायन्स क्लब व विजयसिंह पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांचे संयुक्त विद्यमाने गावात सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या धार्मिक कार्यातही मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून समाजकार्याचा एक आदर्श निर्माण केला व तो इतरांना दिशा देणारा आहे असे प्रतिपादन लायन्स प्रांत ३२३४ ड१ चे माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.
या शिबिराचे उद्घाटन अखंड हरिनाम सप्ताह व्यासपीठ चालक ह.भ.प.रमेश शिवापूरकर महाराज व माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते झाले.यावेळी सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेष आटपाडीकर,घेरडी ग्रामपंचायत सरपंच सुरेश देवकते,सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य ला.अमोल गायकवाड, डॉ .रियाज मुल्ला,कॅबिनेट ऑफिसर ला.प्रा.धनाजी चव्हाण, सांगोला लायन्स क्लबचे सचिव ला.अजिंक्य झपके, सदस्य ला.प्रा.शिवशंकर तटाळे,ला.प्रा.प्रसाद खडतरे,ला.प्रशांत रायचुरे,ला.उमेश नष्टे, संपत्ती कोळेकर,बयाजी लवटे,आबा मोटे,अमीर आतार, सोमनाथ गोडसे, विठ्ठल जगधने,प्रा.गणेश घेरडीकर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती दिली. व या शिबिराच्या आयोजनासाठी प्रा.गणेश घेरडीकर व ग्रामस्थांना धन्यवाद दिले.
सदर शिबिरामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत १२५ रुग्णांची डोळे तपासणी झाली व यामधील पहिल्या टप्प्यात १२ रुग्णांवरती व दुसऱ्या टप्प्यात ८ रुग्णांवरती सांगली येथील लायन्स आय हॉस्पिटल मध्ये अल्पदरात व काही मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी घेरडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



