नागरिकांनी अन्नसुरक्षा योजनेत पुन्हा समावेश करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळावा या उद्दीष्टासाठी “अनुदानातून बाहेर पडा” ही योजना सुरू करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदार यांची तालुकानिहाय मिटिंग घेवून तालुक्यातील जे शिधापत्रिका धारक अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजनेतून लाभ घेतात त्यांना शासन निर्णयाबद्दल माहिती देवून ज्या शिधापत्रिका मधील सदस्य हे नोकरीला व इतर कारणान्वये उत्पन्नात वाढ झालेली असेल अशा सर्व शिधापत्रिका धारक यांनी सदर शासन निर्णयानुसार स्वतः हून स्वेच्छेने “अनुदानातून बाहेर पडा” बाबत विहीत नमुन्यात तहसिल कार्यालयास अर्ज भरून देणे बाबत रास्तभाव धान्य दुकानदार यांच्या मार्फत सुचित करणेत आलेले होते.
दिनांक 19 ऑक्टोबर 2016 चे शासन निर्णयानुसार ज्या शिधापत्रिका धारक यांनी स्वत:हून स्वेच्छेने “अनुदानातून बाहेर पडा” धान्य सोडणे बाबत अर्ज दिलेवर शिधापत्रिका धारक यांच्या उत्पन्नानुसार त्यांना संबंधित तहसिल कार्यालयामार्फत अपात्र केसरी व शुभ्र शिधापत्रिका मध्ये वर्ग करणेत आले आहे. तसेच ज्या शिधापत्रिका धारक यांनी अनावधानाने धान्य सोडणे बाबत अर्ज दिला आहे. त्यांच्याकडून कागदपत्राची पुर्तता करून फेर अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ठ करणेत आले आहे.
तथापि जिल्ह्यात ज्या शिधापत्रिका धारक यांनी अनावधानाने धान्य सोडणे बाबत अर्ज दिला असल्यास अथवा अज्ञानाचा फायदा घेऊन अन्य व्यक्तीने त्यांचा फॉर्म भरून घेतला असल्यास सदर शिधापत्रिकधारकांनी संबंधित तहसिल कार्यालयास रितसर अर्ज सादर करून अर्जासोबत अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अन्वये आवश्यक कागदपत्राची पुर्तता केलेवर सदर शिधापत्रिकाधारकांचा अन्नसुरक्षा योजनेत फेरसमावेश करणेत येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी कळविले आहे.