न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मध्ये ३ जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ‘बालिका दिन’ म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रा.केशव माने,न्यू इंग्लिश स्कूल चे पर्यवेक्षक दशरथ जाधव,तात्यासाहेब इमडे जेष्ठ शिक्षक औदुंबर कांबळे,माणिकराव देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिमा पूजना नंतर सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले यांनी सावित्रीबाई फुले व बालिका दिनाचा आढावा घेवुन सावित्रीबाईंचे स्त्री शिक्षणातील महत्व आधोरेखित केले.त्यानंतर इयत्ता सातवी मधील श्रावणी विष्णू माळी या विद्यार्थींनीचे भाषण पार पडले.
यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कविता शिंदे मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला.सावित्रीबाईंचा १८४० मध्ये महात्मा जोतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. शिक्षणाद्वारे स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले.त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत झाले, हे आपले भाग्य आहे.सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तत्कालीन स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा विचार करून स्त्रियांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून समाज कार्य केले. या कार्यात तत्कालीन समाजकंटकांनी त्यांना अतोनात त्रास दिला. हेटाळणी, दुःख त्यांच्या वाट्याला आले. महात्मा फुले यांच्या पश्चात देखील त्यांनी त्यांचे कार्याचा वसा पुढे चालू ठेवला. आजच्या समाजाने, स्त्रियांनी, विद्यार्थीनींनी या त्यागाची, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार व कार्याची जाणीव ठेवली पाहिजे. त्यांच्या आदर्श विचारांचा नक्कीच अंगीकार केला पाहिजे असे शेवटी त्यांनी सांगितले.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन हजारे सर यांनी केले तर शेवटी आभार चैतन्य फुले सर यांनी मानले.



