ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, *घोडकेपाटील स्कॉलर्स अकॅडमी मध्ये श्यामची आई पुस्तकांचे वाटप*

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक आणि सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस घोडके पाटील स्कॉलर्स अकॅडमीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला .
याप्रसंगी सांगोला तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने अकॅडमीमधील सर्व ४५ मुलांना ग्रंथ मित्र गुलाबराव पाटील यांच्या आवडीच्या श्यामची आई या संस्कारक्षम ग्रंथाचे वाटप, सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री हरिदास शिवाजी घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांचे ग्रंथालय चळवळीतील योगदान खूपच मोठे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यात 79 ग्रंथालय सक्षमपणे कार्यरत आहेत तसेच सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाची भव्य इमारत सुद्धा त्यांच्याच अध्यक्षपदाच्या काळात उभी राहिली. वाचन चळवळीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रंथ मित्र हा सन्मानाचा पुरस्कारही त्यांना शासनाकडून बहाल करण्यात आला असे प्रतिपादन श्री हरिदास घोडके यांनी केले .
याप्रसंगी अकॅडमीचे प्रमुख श्री प्रशांत घोडके सर यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडे मिळण्याची आवश्यकता असून संस्काराशिवाय मिळालेले ज्ञानही समाजासाठी घातक असते. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी श्यामची आई हे अत्यंत प्रेरणादायी व संस्कारक्षम पुस्तक वाचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाकडे असायलाच हवे .
याप्रसंगी संस्कार वाचनालयाच्या सदस्य सोनाली घोडके अकॅडमीच्या शिक्षिका सौ अबोली घोडके मॅडम , सौ योगिता घोडके मॅडम यांच्यासह अनेक ग्रंथप्रेमीं उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शेवटी प्रशांत घोडके सर यांनी सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे आभार मानले.



