महाराष्ट्र
डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभेदार मेजर रामचंद्र काशीद, लेफ्टनंट काशिलिंग व्हनमाने, मेजर संजय रुपनर, एन. सी. सी. ऑफिसर डॉ. जगन्नाथ ठोंबरे, प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
डॉ. जगन्नाथ ठोंबरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन चरित्र व कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसा मधील कटक या शहरात झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठी भूमिका बजावली आणि त्यांच्या शौर्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. भारतीय स्वतंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग हा महत्त्वाचा होता. ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय सेना (INA) स्थापन करण्यात आली त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील देश प्रेम व राष्ट्रीयप्रेम तरुणांना अत्यंत प्रेरणादायी असे ठरले “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा” या त्यांच्या घोषणेने ब्रिटिशांना सळो की पळो करून टाकले. त्यांचा जन्मदिवस आपल्या राष्ट्रासाठी आणि त्यांनी दिलेल्या सर्व बलिदानाची आणि भारताला स्वातंत्र मिळवून देणाऱ्या त्यांच्या धाडसाची आणि शौर्याची आठवण करून देते. हा दिवस केवळ स्वातंत्र्यासाठीच्या त्यांच्या लढ्याचाच नव्हे तर समानता आणि न्यायासाठीच्या लढ्याचाही उत्सव साजरा करतो हा दिवस भारतीयांमध्ये देशभक्ती आणि देशाबद्दल प्रेम निर्माण करतो त्यांचे चरित्र व त्यांचे कार्य निश्चितच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती व देशप्रेम निर्माण करणारे आहे. तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करावी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व त्यांचे कार्य त्यांचा त्याग स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी देशभावना व राष्ट्रभावना जागृत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक रिटे यांनी केले तर आभार ग्रंथपाल सोमनाथ कारंडे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.