कुटुंबातील एकालाच मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ
पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नियमावली लागू केली आहे. या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नोकरदार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पेन्शनर, आयकर भरणारे लाभार्थी कायमस्वरूपी वगळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थी वर्गवारीनिहाय पडताळणी करण्याची प्रक्रिया तालुकास्तरावर मोहिम स्वरूपात चालू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकुण 1 लाख 59 हजार 670 लाभार्थांना विविध कारणाने पी.एम.किसान पोर्टलवर अपात्र करण्यात आले आहे. सदर लाभार्थ्यांच्या अपात्रतेच्या कारणांची पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरावर यादी जिल्हास्तरावरून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर यादीमधील पात्र लाभार्थ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात क्षेत्रिय कर्मचारी यांचेमार्फत 7/12, फेरफार (6ड) उतारा, आधार कार्ड, कुटुंबातील इतर व्यक्तीचे आधार कार्ड (पती-पत्नी 18 वर्षाखालील अपत्य) इ.कागदपत्रे तालुकास्तरीय क्षेत्रिय अधिकारी यांचेकडे जमा करण्यात यावी.
जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र असूनही त्यांचे नाव अपात्र यादीत समाविष्ट आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या गावातील कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधून पात्रतेसाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता तात्काळ करावी. जेणे करून सदर लाभार्थ्यांचा लाभ पुर्नज्जीवित करण्याची प्रक्रिया तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येईल. ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे उपलब्ध होणार नाहीत असे लाभार्थी या योजनेपासून कायमस्वरूपी अपात्र होतील.
पी.एम.किसान योजना अंतर्गत अपात्रतेचे निकष – एकाच कुटुंबातील लाभार्थी (पती-पत्नी 18 वर्षाखालील अपत्य वगळून)., राज्याचा रहिवाशी नसलेले लाभार्थी , संविधानिक पदावरील व्यक्ती, माजी संविधानिक पदावरील व्यक्ती, केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था निमशासकीय कर्मचारी,जमिन विक्रीमुळे भूमिहिन लाभार्थी,संस्था मालकी असलेल्या जमिनधारक,नोंदणीकृत व्यवसायिक,सलग 3 वर्ष आयकर भरणारे लाभार्थी, स्वत:लाभ समर्पित केलेले लाभार्थी, वयोवृध्द, सेवा निवृत्तीधारक लाभार्थी,जमिनीची मालकी स्वत: नावे नसलेले लाभार्थी,दुबार नोंदणी असलेले,शेती शिवाय इतर कारणासाठी वापरणारे जमिनधारक,अनिवासी भारतीय,खोटी माहिती द्वारे नोंदणी केलेले लाभार्थी. या योजनेतून अपात्र करण्यात येतील असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी कळविले आहे.