बर्ड फ्लू बाबत सतर्कतेचे आवाहन
– जिल्ह्यातील सर्व शासकीय खाजगी व परीसरातील कुक्कुट पालक तसेच पशुपालक , शेतकरी व सुजान नागरीकांना कळविण्यात येते की , आपल्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू /एव्हिएन इन्फ्लूएन्झा (H5N1) या आजाराने कुक्कुट पक्षी व कावळ्यांमध्ये मरतुक झालेली आढळल्याने आपण ह्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोजची आपल्या प्रक्षेत्रावरील स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून जैवसुरक्षा विषयक बाबींचे काटेकोर पणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच संशयीत ठिकाणाहून पक्षांची वाहतुक टाळावी आणि ज्या ठिकाणी स्थलांतरीत पक्षी मोठ्याप्रमाणात आढळतात तेथील नागरीकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एन.एल. नरळे यांनी केले आहे.
तसेच मानवी आहारामध्ये व्यवस्थित उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. याबाबत कोणीही अनावश्यक गैरसमज अथवा अफवा पसरवू नयेत. जिल्ह्यामध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर पक्षांमध्ये मरतूक किंवा या आजाराचे लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्याशी संपर्क साधावा . त्याचबरोबर सर्व क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कुक्कुट प्रक्षेत्राला नियमित भेट देऊन जैवसुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे व आपल्या कार्यक्षेत्रातील रोग प्रादर्भावाबाबत दक्ष रहावे असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे यांनी केले आहे.