आदित्य ठाकरे यांचा ठरला सांगोला दौरा
संगेवाडी आणि मांजरी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आगामी काळात बंड करुन शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार असून सांगोला तालुक्यातील संगेवाडी आणि मांजरी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची माहिती सेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिली.
आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते १० वाजता सांगोला तालुक्यातील संगेवाडी आणि मांजरी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे भेटी देणार आहेत. आता शहाजीबापू पाटील आदित्य ठाकरे यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहावं लागणार आहे.
आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी विठ्ठलाचे दर्शन घेऊन शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त संगेवाडी आणि मांजरी येथे बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे याच गावातून शहाजीबापू पाटील यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता, अशी माहिती शिवसेनेचे लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.