महाराष्ट्र
हिमाचल दर्शनाने भारावले सांगोला विद्यामंदिरचे विद्यार्थी
![](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250206-WA0059-780x470.jpg)
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता 9वी व 11वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दि. 18 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अमृतसरमधील जालीयनवाला बाग, शिखांचे धर्मस्थळ सुवर्ण-मंदिर, वाघा बॉर्डर, मनाली व कुलू या थंड हवेच्या ठिकाणांसह चंदीगड या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यात आल्या. या सहलीमध्ये एकूण 107 विद्यार्थी व 13 शिक्षक यांनी सहभाग नोंदवला होता.
सर्वप्रथम सांगोला नगरीचे ग्रामदैवत अंबिकादेवीचे दर्शन घेऊन उपस्थित पालक व बस चालक यांच्या शुभहस्ते सर्व बसेसचे पूजन करून सहलीचे शनिवार, दि.18 जानेवारी रोजी पहाटे 5.00 वाजता प्रशालेच्या प्रांगणातून सोलापूरकडे प्रस्थान झाले.
सोलापूर ते चंदीगड रेल्वेप्रवासानंतर अमृतसर येथे शिखांचे धर्मस्थळ सुवर्ण-मंदिर, जालियनवाला बाग येथे भेट देत सर्व विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली.
भारतीय सैन्यदलाची प्रथम सुरक्षा रेषा असणारी वाघा बॉर्डर येथील सैनिकांची परेड पाहून विद्यार्थी देशभक्तीत मंत्रमुग्ध झाले. “भारत माता की जय” असा जयघोष करत दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थी सकाळी सहा वाजता मनालीच्या दिशेने मार्गस्थ झाले. मनालीमध्ये तिबेटियन बुद्धविहार पहात मॉल रोडवर विद्यार्थ्यांनी खरेदीचा आनंद घेतला. मनाली मधील वशिष्ठ मंदिर व गरम पाण्याचे कुंड या ठिकाणी भेटी दिल्यानंतर सुप्रसिद्ध हिडिंबा देवी मंदिर, घटोत्कच मंदिरामध्ये दर्शन घेत उंच उंच पाईन वृक्षांमधील जंगल सफारीमुळे विद्यार्थी आनंदीत होऊन गेले. मनाली मधील थंड वातावरणाचा मनमुराद आस्वाद घेत दुपारच्या जेवणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी झिपलाईन स्लाइडिंग या ऍडव्हेंचरस् राईडचा अनुभव घेतला.
सोलंग व्हॅलीच्या बर्फामध्ये स्लाइडिंग आणि स्केटिंग करत विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले.
तद्नंतर कुलूकडे प्रस्थान करत रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला. तेथील वैष्णौदेवी मातेचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनियोजित चंदीगडमधील रॉक गार्डन, सुकना लेक, रोज गार्डन आदी प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेत परतीचा प्रवास दि. 25 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3:30 वा. चंदीगड ते मिरज 38 तासांचा नियोजित रेल्वे प्रवास करत सहल सर्व विद्यार्थी व शिक्षकांसह सुरक्षितरित्या दि. 26 जानेवारी 2025 रोजी सायं. 5:30 वाजता मिरज येथे आणि रात्री 8.00 वाजता प्रशालेच्या प्रांगणामध्ये पोहोचली.
सदर सहल यशस्वी करण्यासाठी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार शंकरराव सावंत सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी झपके यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य अमोल गायकवाड, सहल विभागप्रमुख प्रा.डी.के.पाटील, सचिन बुंजकर, प्रा.शिवशंकर तटाळे, प्रा.सुहास काळेल, प्रा.जालिंदर मिसाळ, प्रा.तानसिंग माळी, अन्सार इनामदार, वसंत गुळमिरे, सौ.शैलजा झपके, प्रा.सौ.माधुरी पैलवान, प्रा.सौ.आश्विनी जालगिरे, प्रा.कु.सुप्रिया गायकवाड या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. वरील सहलीचे सर्व नियोजन (प्रवास,भोजन व निवास व्यवस्था) मधुरिया टूर्स, सोलापूरचे दत्तात्रय काळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले.