सांगोला विद्यामंदिरमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचा सदिच्छा समारंभ संपन्न
![](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0039-780x470.jpg)
सांगोला (वार्ताहर) विद्यार्थ्यांची दैनंदिन सराव चाचण्यातून उत्कृष्ट तयारी झाली असून यामधून आपणास जे नैपुण्य प्राप्त झाले आहे त्याचा पुरेपूर वापर परीक्षेला सामोरे जाताना करा व सांगोला विद्यामंदिरची निकालाची उज्वल परंपरा कायम राखा असे निवेदन प्राचार्य अमोल गायकवाड यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये आयोजित इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका सौ.शहिदा सय्यद, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, सुरेश मस्तुद, संस्था व प्रशाला बाह्यपरीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे व वैभव कोठावळे, आठवी विभागप्रमुख रमेश बिले, पाचवी विभागप्रमुख नागेश पाटील व दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य अमोल गायकवाड यांनी सध्या सुरू असलेल्या चाचण्यांच्या गुणांवरून सर्व विद्यार्थ्यांना योग्य तर्कसंगती, गतिमान आकडेमोड व बुद्धीचा पुरेपूर वापर करण्याची सवय दिसून येत असून रविवारी होणारी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांची रंगीत तालीम आहे या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सदिच्छा देत सांगोला विद्यामंदिरची राज्य व जिल्हा गुणवत्तेची परंपरा अबाधित राखण्यासाठी आपण सर्व सज्ज रहा असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून पर्यवेक्षक प्रदीप धुकटे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या प्रेरणेतून व सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी आणि आठवीच्या टीमने संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत संपवत घटक व सराव चाचण्या घेत व निकाल जाहीर करत, रात्र अभ्यासिका, पालक सभा, शिक्षक-पालक योजना, गृहभेटी, प्रोत्साहनपर बक्षीस योजना यासारख्या विविध गोष्टीतून विद्यार्थी परीक्षेसाठी परिपूर्ण घडवले असून याचा परिपाक आपणास उद्याच्या परीक्षेत नक्कीच दिसणार आहे असे नमूद करत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला व प्रोत्साहन देत शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी रमेश बिले यांनी शिक्षक मनोगतातून प्रत्यक्ष परीक्षेवेळी करावयाच्या बाबी विद्यार्थ्यांना सांगत तणावरहीत वातावरणात परीक्षा देण्याविषयीचा सल्ला दिला.
वैष्णवी इंगोले, दिवीज अंकलगी, श्रावणी लवांडे, ओम काळेल या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून वर्षभर अचूक नियोजनातून शाळेने व जादा तासातून शिक्षकांनी घेतलेल्या श्रमाबद्दल ऋण व्यक्त करत निकालाची खात्री दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशितोष नष्टे तर आभार प्रदर्शन दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी चैतन्य कांबळे, दत्तात्रय कांबळे, सचिन बुंजकर, अजित मोरे, रूपाली देशमुख, धनश्री ढोले, रूपाली सरगर, वंदना टिंगरे, शितल मेहेरकर, भाग्यश्री मिरजे, शुभांगी पलसे, अश्विनी साळुंखे, सुवर्णा कांबळे, कविता राठोड, निलेश जंगम, उमेश नष्टे या मार्गदर्शक शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व नरेंद्र होनराव सर यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बाह्यपरीक्षा विभागातील सर्व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.