इतिहास विभागाची ऐतिहासिक सहल संपन्न

सांगोला महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत चालू शैक्षणिक वर्षातील ऐतिहासिक अभ्यास सहलीचे नियोजन करण्यात आले होते.या नियोजानांतर्गत विभागातील एकूण २४ विद्यार्थी व दोन प्राध्यापक यांनी सहलीमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये दिनांक.७ फेब्रुवारी रोजी कोकणातील निसर्ग पर्यटन तसेच ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या. त्यामध्ये दिवेआगर येथील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला तसेच कोकणातील शेती विषयक माहिती आणि पर्यटन व्यवसायाची माहिती जाणून घेतली,त्याचप्रमाणे दिघी येथील प्राचीन व्यापारी मार्गावर असलेल्या महत्वपूर्ण बंदराची माहिती व तेथील जलवाहतूक याची देखील माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. दिघी बंदर ते मुरुड जंजिरा किल्ल्यापर्यंत बोटीने प्रवास करून जल पर्यटनाचा आनंद घेतला. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे १९ बुलंद बुरूज आहेत जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात.या संपूर्ण किल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
दिनांक.८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक रायगड किल्ला आणि शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. इ.स.१६७४ मध्ये येथेच स्वतःला महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर इ.स.१६८९ पर्यंत तो छ. संभाजी महाराजांच्या ताब्यात होता. रायगड किल्ल्याचे श्रीगोंदे टोक,टकमक टोक,हिरकणी टोक, भवानी टोक हे चार भाग आहेत. किल्ल्यावर वाडेश्वर (सध्याचे जगदीश्वर) मंदिराच्या दक्षिणेला दोन कोठारे व बारा टाकी नामक पाण्याच्या टाक्यांचा समूहाची पाहणी करण्यात आली. रायगड किल्ल्यावर दोन शिलालेख असून ते दोन्ही वाडेश्वर मंदिराच्या नगारखान्यावर आहेत. उत्तरेस गडावरील प्रसिद्ध बाजारपेठेचे अवशेष जोत्याच्या रूपाने अवशेष आहेत. मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या पुढे शिवछत्रपतींची समाधी व घुमटाकृती स्मारक आहे. किल्ल्यावर पुरातत्त्व विभागातर्फे खूप मोठ्या प्रमाणात रायगड जतन आणि संवर्धनाची कामे चालू आहेत त्यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी जतन संवर्धन कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला.व पुणे जिल्ह्यातील प्रति बालाजी म्हणून समजल्या जाणाऱ्या आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी मंदिराचे दर्शन घेण्यात आले.
दिनांक.९ फेब्रुवारी रोजी राजगड हा शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी राजगड किल्ल्यास भेट दिली. गुंजवणे गावातून उत्तरेकडील पद्मावती, पूर्वेला सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या पाहून बालेकिल्ला देखील पाहण्यात आला. यांवर गणेश, मारुती, ब्रह्मर्षि, जननी काळेश्वरी, भागीरथी आणि पद्मावती यांची लहान मोठी मंदिरे आणि दारूखाना, दिवाणघर, राजवाडा, पागा इ. कमीअधिक पडीक अवस्थेतील वास्तू आहेत. प्रत्येक माची व बालेकिल्ला यांवर पाण्याची व्यवस्था असून पद्मावती माचीवरील तळे पुष्कळच मोठे आहे. बालेकिल्ल्यावर राजसदर व इतर वसाहतीचे अनेक पुरावे दिसतात.महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जतन व संवर्धनाची कामे चालू आहेत हि कामे कशी केली जातात याची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्यदैवतश्री जेजुरी खंडोबाचे दर्शन घेण्यात आले.
इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असेलेल्या ऐतिहासिक व पुरातत्वीय साधनाची माहिती घेतली धार्मिक पर्यटन,ऐतिहासिक पर्यटन,शिवकालीन दुर्गस्थापत्य आणि कला,पुरातत्वीय साधने ऐतिहासिक साधने आणि गडकिल्यांची पाहणी करून विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटीतून इतिहासाची माहिती देण्यात आली. सदरील शैक्षणिक सहल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ.सदाशिव देवकर आणि डॉ.महेश घाडगे यांनी यशस्वी केली.