महाराष्ट्र
महूद ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

राजे ग्रुप व महूद ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.या निमित्ताने प्रतिमा मिरवणुकीवरील अनावश्यक खर्च टाळत पंढरपूर येथील ट्यूलिप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करून सामाजिक उपक्रमाने ही जयंती साजरी केली.या सर्व रोग निदान शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.
येथील राजे ग्रुप व महूद ग्रामस्थांच्या वतीने मुख्य चौकात सकाळी भगवा ध्वज फडकविण्यात आला.यानंतर छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रमाता जिजाऊ,तुळजाभवानी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महूद व महूद परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आपली मनोगते व्यक्त केली.प्रथमेश कांबळे या विद्यार्थ्याने पोवाडा सादरीकरण केले. उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने येथील छत्रपती संभाजी चौकामध्येही भगवा ध्वज फडकविण्यात आला.ग्रामपंचायत कार्यालयात व विविध शैक्षणिक संस्थांमध्ये,सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी शिवप्रतिमेची पूजा करण्यात आली.
येथील राजे ग्रुप,शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिमा मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळत तसेच डॉल्बी,डीजे यासारख्या कर्कश वाद्यांचा वापर टाळून पंढरपूर येथील ट्यूलिप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने येथील ग्रामपंचायतीच्या गणपतराव देशमुख सभागृहात सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धनंजय काटकर,ट्यूलिप हॉस्पिटलचे आर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.प्रशांत निकम, एम.डी.मेडिसिन डॉ.अतुल बोरुडे,डॉ. विलास सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महूद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद नागणे, अंगद जाधव,डॉ. उदयसिंह जाधव,डॉ. प्रशांत देशमुख,डॉ.संतोष नष्टे आदी उपस्थित होते.या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले. यावेळी रुग्णांची मोफत रक्तशर्करा तसेच मशीन द्वारा मोफत हाडांचे घनता तपासण्यात आली.या शिबिराचा महूद परिसरातील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.
—————————————
डी.जे.,डॉल्बी सारखी वाद्ये न वाजविण्याचा निर्धार कायम
गतवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित प्रतिमा पूजन कार्यक्रमात राजे ग्रुप व जयंती उत्सव समितीच्या वतीने यापुढे जयंती निमित्ताने डी.जे.,डॉल्बी सारखी आरोग्यास हानिकारक वाद्ये न वाजविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.तो याही वर्षी पाळण्यात आला.उत्सव समितीच्या वतीने यावर्षी डी.जे.,डॉल्बी चा वापर टाळला आहे.