महाराष्ट्र
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान सांगोला संस्थेचा 47 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

शनिवार दिनांक 22/2/2025 रोजी दासनवमी दिवशी संस्थेचा वर्धापनदिन कै. लक्ष्मीबाई केळकर सभागृहात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात शुभांगी कवठेकर यांची गायलेल्या समर्थांच्या ‘कल्याण करी रामराया ‘ या प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख संस्थेच्या मुख्याधिकारी अश्विनी कुलकर्णी यांनी केले. यानंतर संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन संस्थेच्या सचिवा वसुंधरा कुलकर्णी यांनी केले. यानंतर संस्थेच्या सर्व विभागातील ‘ गुणवंत कर्मचारी ‘ पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. निलिमा कुलकर्णी यांनी सर्व गुणवंत कर्मचाऱ्यांची माहिती दिली. संस्था विभागातून आप्पा घोरपडे,मुख्याधिकारी अश्विनी कुलकर्णी, बालक मंदिर विभागातून मुख्याध्यापिका मधुरा शास्त्री, प्राथमिक विभागातून वर्षा रास्ते, माध्यमिक विभागातून वैभव कोडग, सहशिक्षक रवी कुंभार,शिक्षकेतर कर्मचारी मंगेश कुलकर्णी तसेच संपूर्ण शिक्षण विभागातून विद्यालयाचे प्राचार्य सुनील कुलकर्णी यांना पुरस्कार देण्यात आले.
संस्थेच्या उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सुनील बिडकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी 25000/ – संस्थेस देणगी दिली.
प्रमुख पाहुणी कु. मधुरा कुलकर्णी , पुणे यांचे ‘समर्थ रामदास स्वामी व समाज प्रबोधन’ या विषयावर प्रवचन झाले.
समर्थ रामदासांच्या वेळी समाजात असलेली विविध समस्या पाहून त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले.
बाल वयातच लहान मुलांना एकत्र करून सूर्यनमस्कार घालण्यापासून मुलांना एकत्र केले. गावोगावी हनुमानाची मंदिरे बांधली. समर्थ संप्रदायाचे प्रभु श्री राम हे आराध्य दैवत बनवले. अद्वैत वाद खूप चांगल्या प्रकारे त्यांनी समजावून सांगितले. दुःखाचा समूळ नायनाट करायचा असेल तर मारुती सारखे दैवत आवश्यक आहे. या साम्राज्याकडे शक्ती नाही त्या साम्राज्याची वाताहात होते. समर्थांनी शक्ती उपासनेला महत्त्व दिले आहे. त्यासाठी मारुतीची उपासना करणे सांगितले आहे. आपण प्राप्त केलेले ज्ञान हे कशाप्रकारे समाजाच्या उपयोगी आणू शकतो म्हणजे प्रबोधन.”अशा शब्दात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा सह धर्मादाय आयुक्त श्री. प्रवीण कुंभोजकर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री. कुंभोजकर यांनी त्यांच्या वडिलांनी शालेय जीवनात दासबोधाची कशी ओळख करून दिली आणि आपल्या शालेय जीवनापासून दासबोधाची कशी साथ आहे . आणि मनाचे श्लोक आल्या जीवनात कसे उपयोगी आहेत हे उदाहरणांचा माध्यमातून सांगितले. आपल्याला कोणी सांगितले म्हणून गुरू करू नका,आपण स्वतः तपासून जो आपल्याला भावेल तोच गुरू करून घ्या. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, त्यामुळे आपल्याला आवडेल ते पुस्तक वाचा . समर्थांनी सांगितल्या प्रमाणे अनेक गोष्टी न्याहाळा, स्वतः त्याची अनुभूती घ्या. आपले आयुष्य सुकर करण्यासाठी समर्थांच्या विचारांचा पदोपदी अनुभव घेऊ शकतो याचा अभ्यास करूया आणि आपले जीवन जास्तीत जास्त सुकर करूया.प्रत्येकात राम आहे आपण तो ओळखला पाहिजे. या शब्दात मार्गदर्शन केले.
यावेळी संस्था अध्यक्षा प्रा. निलिमा कुलकर्णी, उपाध्यक्षा डॉ. संजीवनी केळकर, सचिवा सौ.वसुंधरा कुलकर्णी , खजिनदार डॉक्टर शालिनी कुलकर्णी, ॲड. मनीषा भोसेकर, संस्थेच्या कार्यकर्त्या, माजी शिक्षिका, संस्था कर्मचारी , स्थानिक महिला वर्ग, संस्थेचे स्थानिक हितचिंतक इत्यादी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा दौंडे यांनी तर आभार मंगल कुलकर्णी यांनी मांडले